क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

येथील युनियन जिमखाना मैदानावर नीना स्पोर्ट्स क्लब आयोजित 13 वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ, सीसीआय, विजया क्रिकेट अकादमी व आनंद क्रिकेट अकादमी संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
आजच्या सामन्यातून एसीए, विजया, निना व सीसीआय संघानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजय संपादन केले. अभिनवकुमार, शुभम खोत, अथर्व करडी, साईराज साळुखे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात नीना स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 9 गडी बाद 263 धावा केल्या. त्यात अभिनवकुमारने 16 षटकार व 11 चौकारासह 66 चेंडूत 159 धावा करून आक्रमक शतक झळकविले. त्याला झोया काझीने 42 धावा करून सुरेख साथ दिली.
एसकेई सोसायटीतर्फे आदित्य जाधव, निवृत्ती पावसकर यांनी प्रत्येकी 2 तर प्रथम व पार्थ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल एसकेई संघाने 25 षटकात सर्व गडीबाद 161 धावाच केल्या त्यात पार्थ केळुसकरने 46, प्रथमकुमार कम्मारने 17 तर अजित जाधवने 14 धावा केल्या. निनातर्फे समर्थने 4 तर झियान, अभिनव व फरान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात सीसीआय संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 5 गडी बाद 192 धावा केल्या. त्यात शुभम खोतने 49, कैलाशने 34 तर आर्यनने 27 धावा केल्या. बीएससी बी तर्फे बालाजीने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल बीएससीने 25 षटकात 7 गडी बाद 144 धावाच केल्या. त्यात यशोनंदने 45 तर साहीलने 33 धावा केल्या. सीसीआयतर्फे आर्यन ने 3 गडी बाद केले.
तिसऱया सामन्यात जिमखाना क्लॉथने प्रथम फलंदाजी करताना 10.3 षटकात सर्वबाद 47 धावा केल्या. अर्जुनने 10 धावा केल्या. एसीए तर्फे अथर्व करडीने 5 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एसीएने 12.5 षकटात 3 गडी बाद 48 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. जिमखाना तर्फे निधी पाटील व अनिष तेंडुलकरने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
चौथ्या सामन्यात विजया क्रिकेट संघाने 25 षटकात 4 गडी बाद 176 धावा केल्या. साईराज साळुंखेने 62 तर ओमकरा चौगुलेने नाबाद 45 धावा केल्या. बीएससी ए तर्फे सोहम व केदारनाथ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल बीएससी ए ने 24.5 षटकात सर्व गडी बाद 149 धावाच केल्या. त्यात सुरेंद्र पाटीलने 40, सुमित भोसलेने 30 तर केदारनाथने 23 धावा केल्या. विजयातर्फे साईराज साळुंखेने 3 तर गौरव पाटीलने 2 गडी बाद
केले.
रविवारी उपांत्य फेरीचा पहिला सामना बेळगाव स्पोर्ट्स वि. सीसीआय यांच्यात तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना विजया क्रिकेट अकादमी वि. आनंद क्रिकेट अकादमी यांच्यात होणार आहे.









