प्रज्ञा मणेरीकर/ पणजी
पणजीत उद्या शनिवार 16 ते 24 जानेवारी रोजी दरम्यान होणाऱया 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यात येणार असल्याने यंदा उद्घाटन व समारोप सोहळय़ाला प्रेक्षकांच्या व सिनेरसिकांच्या उपस्थितीवर मर्यादा आणण्यात आली आहे. आंचिमला आता दोनच दिवस शिल्लक राहिले असल्याने राजधानीत आंचिमची तयारी जोरात सुरू असली तरी या महोत्सवाला येणाऱया दिग्गजांची नावे अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
दि. 16 रोजी होणाऱया आंचिमच्या उद्घाटन सोहळय़ाला दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता सुदीप संजीव यांची उपस्थिती असणार आहे. तसेच मंत्र्यांचीही उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन सोहळा दुपारी 3 ते सायं. 4.30 वाजेपर्यंत बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे होईल. सायं. 7 वा. कला अकादमी येथे डॅनिश फिल्ममेकर थॉमस विंटरबर्ग यांच्या ‘द अनादर राऊंड’ या चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

फिझीकल स्क्रीनिंगसाठी चित्रपट गोवा मनोरंजन सोसायटीच्या चार मल्टिप्लेक्समध्ये आणि दोन मॅकेनिज पॅलेसमध्ये आणि 1 कला अकादमीमध्ये दाखविण्यात येतील. प्रत्यक्षरित्या सुमारे 200 स्क्रीनिंग होणार आहेत. आतापर्यंत महोत्सवात 2246 प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. आंचिमचा उद्घाटन व समारोप सोहळा सिनेरसिकांना ऑनलाईन पद्धतीनेही पाहायला मिळणार आहे.
सोळा विभागात 200 चित्रपटांची मेजवानी
इंडियन पॅनोरमा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभाग, होमेज, रेट्रोस्पेक्टिव्ह, सत्यजित रे श्रद्धांजली विभाग, मिडफेस्ट, गोमंतकीय विभाग, स्पेशल स्क्रीनिंग, उद्घाटन व समारोपाचा चित्रपट, कंट्री फोकस, असे 16 विभागातील चित्रपट सिनेरसिकांना पाहायला मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
कोरोनामुळे उपस्थिती, कार्यक्रमावंर मर्यादा राजधानीत आंचिमची तयारी जोरात सुरू असून नोंदणी कक्ष उभारण्यात आले आहेत. कला अकादमी व गोवा मनोरंजन सोसायटी येथे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहेत. परंतु उद्घाटन सोहळय़ाला उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा आणण्यात आली आहे. जेमतेम 200 जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच सरकारकडून जारी करण्यात आलेल्या कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे महोत्सवातील अनेक कार्यक्रमांवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. मार्गदर्शक तत्त्वे असली तरीही राजधानी आंचिमच्या रंगात रंगत आहे. मर्यादा असल्या तरीही आंचिमची तयारी जोरात सुरू आहे.









