हा चित्रपट बनवण्यासाठी मला माझी सर्व बचत खर्च करावी लागली: सिद्धार्थ त्रिपाठी
पणजी/प्रतिनिधी
कोळसा खाणीच्या कामामुळे, शौकी आणि त्याचा कुत्रा खेरु यांना गावातून विस्थापित व्हावे लागते, मात्र शौकीच्या खेरूवरच्या निर्व्याज, निरपेक्ष प्रेमामुळे तो त्याच्याचसोबत राहण्याचा आग्रह धरतो. छत्तीसगढी भाषेतल्या या चित्रपटात, माणूस आणि कुत्रा यांच्यातील निर्व्याज, वेगळ्या पद्धतीच्या प्रेमाची कथा सांगण्यात आली आहे. गोव्या इथे सुरु असलेल्या 51 व्या इफ्फिमध्ये इंडियन पॅनोरमा विभागाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा गटात या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
‘या वेगळ्या विषयावरचा चित्रपट बनवण्यासाठी मी एकदाच निश्चय पक्का केला आणि मग मागे हटलो नाही” असे या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ त्रिपाठी यांनी सांगितले. इफ्फीमध्ये आज हा चित्रपट दाखवल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोळसा खाणीमुळे जेव्हा संपूर्ण गाव विस्थापित होणार असते, अशा वेळी खाण कंपनीकडून शौकीला गाव सोडण्याची शेवटची नोटीस दिली जाते. मात्र, त्यावेळी त्याच्या मनात विचित्र विचार येतात: खेरू आज रात्री मरणार आहे. खेरू मेला आहे याच समजुतीत शौकी संपूर्ण रात्र भुकेने व्याकूळ होत, त्याच्या आठवण करत काढतो.
“हा चित्रपट बनवण्यासाठी मला माझी आजवरची पूर्ण बचत खर्च करावी लागली. चित्रपटाच्या वितरणाच्या वेळी देखील मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला” असे त्रिपाठी यांनी सांगितले.
छत्तीसगड मधल्या ग्रामीण स्थानिक समुदायाची आपल्याला पूर्ण माहिती असल्याने त्या समुदायावर चित्रपट काढणे सोपे गेले, असेही त्यांनी सांगितले.
चित्रपटा ची पटकथाही त्यांनीच लिहिलेली आहे. त्याविषयी माहिती देतांना त्यांनी सांगितले की, “ही कथा स्वतःच पुढे पुढे जात गेली आणि सुरुवातील जे लिहिले हिते, त्यात अनेक वेगवेगळे वळण येत गेले.त्यानंतर प्रत्यक्ष चित्रपटनिर्मितीच्या वेळी देखील त्यात अनेक बदल झाले.”
त्रिपाठी यांनी कोलकात्याच्या SRFTI छायाचित्रणाची पदवी घेतली आहे. ‘अ डॉग अँड हिज मॅन’हा त्यांचा पहिला सिनेमा आहे.