विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स हे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचे भक्कम आधारस्तंभ. फलंदाजीत हे दोघेही दणकेबाज प्रदर्शन साकारण्याची क्षमता तर राखून असतातच. शिवाय, त्यांच्यातील मैत्री कशी उत्तम आहे, हे अनेकदा मैदानावर, ड्रेसिंगरुममध्ये दिसून येत आले आहे. मैदानाबाहेर देखील ते परस्परांचे उत्तम मित्र राहिले आहेत. या उभयतांनी अनेक महत्त्वपूर्ण भागीदारी साकारत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. एकमेकांबद्दल त्यांना आदरही आहे. या पार्श्वभूमीवर आरसीबीने एक व्हीडिओ पोस्ट केला असून त्यात विराट आपण एबी डीव्हिलियर्सला चक्क बिस्कीट अशी हाक का मारतो, याचा खुलासा करतो आहे.
विराट म्हणतो, ‘मी हा शब्द दक्षिण आफ्रिकन स्लँगमधून निवडला आहे. या आफ्रिकन स्लँगनुसार, जे लोक आपल्याला अधिक पसंतीचे असतात किंवा जे आपल्या अगदी जवळचे असतात, त्यांना बिस्कीट किंवा बिस्कूट असे म्हटले जाते. एबी डीव्हिलियर्स माझ्यासाठी जवळचा आहे आणि त्याचमुळे मीही त्याला बिस्कीट म्हणूनच हाक मारतो’!
एबी डीव्हिलियर्स 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघात दाखल झाला आणि त्यानंतर तो याच संघात कायम राहिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर देखील तो या संघातील सदस्य आहे आणि जवळपास प्रत्येक सामन्यात अंतिम 11 सदस्यीय संघातील त्याचे स्थान निश्चित राहत आले आहे. विराट व एबीडी यांची पहिली भेट 2011 दरम्यान झाली होती.
विराटने त्या आठवणीला उजाळा देताना सांगितले, ‘एका स्टेडियमध्ये टनेल होते, जेथून खेळाडू मैदानावर जातात किंवा मैदानातून परत येतात. एकदा आम्ही सरावासाठी आत जात होतो आणि दक्षिण आफ्रिकन संघ सराव आटोपून परत येत होता. त्यावेळी एबी डीव्हिलियर्सला मी आरसीबी संघाकडून खेळण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आणि त्यानंतर मला आरसीबीशी करारही करता आला.’









