निपाणी तालुक्यातील विदारकता : अहवाल मिळण्यास विलंब, विद्यार्थ्यांसह शिक्षकांची गैरसोय
वार्ताहर / निपाणी
शाळा, महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे. यामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. असे असले तरी शाळा-महाविद्यालयातील प्रवेशासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. यामुळे सर्वांचीच आता कोरोना चाचणी करून घेऊन अहवाल मिळविण्याची धडपड सुरू आहे. पण याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याने कोरोना चाचणी व नंतर अहवाल मिळण्यात दिरंगाई होत आहे. निपाणी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी कोरोना चाचणी करून घेतली आहे. पण यातील बहुतांशी शिक्षकांचे कोरोना अहवाल प्रलंबित आहेत. असे असताना गटशिक्षणाधिकाऱयांनी निपाणी तालुक्यात एकही शिक्षक कोरोना बाधित नाही. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे जाहीर केले आहे. जर अहवालच आले नसतील तर शिक्षक निगेटिव्ह कसे?, असा सवाल पुढे येत आहे.
कोरोना संसर्ग वाढता वाढता त्याचे महामारीत रुपांतर झाले. यामुळे संसर्ग रोखण्यासाठी शासनाने पाऊल उचलताना तातडीने शाळा-महाविद्यालये बंद केली. आठ महिन्यांपासून बंद असणाऱया शाळांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या उद्देशाने ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया सुरू केली. यातून विद्यार्थ्यांची शिक्षणाशी असणारी नाळ टिकून राहिली. सध्या कोरोना संसर्ग कमी होताना शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचे मार्ग खुले झाले आहेत. यानुसार काही वर्ग सुरू करून सुसूत्रता आणली जात आहे.
शैक्षणिक संस्था सुरू केल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांचे संमतीपत्र सक्तीचे केले आहे. याला पालकांनीही विरोध केला नसून पाल्याच्या शिक्षणासाठी धोका दुर्लक्षित करून संमतीपत्र देण्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी कोरोना चाचणी व अहवाल सक्तीचा केला आहे. शासनाच्या या सक्तीलादेखील कोणीच विरोध केला नाही. पण आता शासनाचे आरोग्य खाते सक्षम नसल्याने कोरोना चाचणी होण्यासह अहवाल मिळण्याला दिरंगाई होत आहे.
अहवालच हाती नसल्याने गैरसोय
अकोळ या प्राथमिक आरोग्य केंद्रात 8 रोजी 50 शिक्षक, विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. हे शिक्षक व विद्यार्थी गेल्या 12 दिवसांपासून अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. पण अहवालच हाती नसल्याने गैरसोय होत आहे. स्थानिक शिक्षक चाचणी करून अद्यापनाचे काम करत आहेत. पण बाहेरगावी शिक्षणासाठी असणारे विद्यार्थी मात्र अहवालाविना शिक्षणापासून वंचित राहू लागले आहेत. या विद्यार्थ्यांच्या होणाऱया शैक्षणिक नुकसानीला आरोग्य विभागच जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. यातून सर्व स्तरातून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
कोरोना टेस्ट केलेल्यांच्या मोबाईलवर अहवाल
कोरोना चाचणी करण्यासाठी आवश्यक नमूना (स्वॅब) प्राथमिक आरोग्य पेंद्रातून घेतले जातात. याची तपासणी व अहवाल देण्याचे काम जिल्हा रुग्णालयातून होते. त्याचबरोबर अहवाल चाचणी केलेल्यांच्या मोबाईलवर दिला जातो. याची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्रात होत नाही, असे अकोळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. शीतल कुलकर्णी यांनी सांगितले.
पॉझिटिव्ह असेल तर जबाबदार कोण?
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. असे असले तरी प्रतिबंधासाठी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच कोरोना टेस्ट सक्तीची केली आहे. पण याचे गांभीर्यच प्रशासनाला नसल्याने अहवाल देण्यात दिरंगाई केली जात आहे. चाचणी केलेल्यांमध्ये जर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह असेल आणि अहवालाविना सर्वत्र फिरत राहिल्यास संसर्ग वाढला तर जबाबदार कोण? अशी चिंता व्यक्त होत आहे.









