खानापूर तालुक्यातील अबनाळीत १४४ पॉझिटिव्ह, आठ दिवसानंतर वैद्यकीय अहवालात निष्पन्न, पण सद्यपरिस्थितीत गावात कोणतेच संकट नाही
खानापूर/ प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील अबनाळी गावात आठ दिवसापूर्वी पूर्वार्जित एका विहिरीतील पाणी गावाने पिण्यासाठी वापरल्याने गावातील बऱ्याच लोकांना ताप व सांधेदुखीचा त्रास झाल्याची घटना घडली होती, त्यामुळे आरोग्य खात्याने गावांमध्ये घेऊन जवळपास १५० लोकांची तपासणी व त्यांच्यावर उपचार केले होते. सदरचा अहवाल तब्बल आठ दिवसानंतर आज दिनांक २० रोजी प्रसिद्ध करण्यात आला. तपासणी केलेल्या पैकी १४४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले आहे. पण आजची वास्तव परिस्थिती पाहता गावांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीला कोणताही त्रास होत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
या गावचे ग्रामपंचायत सदस्य महादेव शिवोलकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आठ दिवसांपूर्वी गावातील पाणी समस्या लक्षात घेता जुन्या पारंपारिक विहिरीत स्वच्छता मोहीम राबवून गावासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. पण सदर विहिरीतील पाणी पिताना तुरटी औषध टाकून ते पिणे गरजेचे होते पण त्या ठिकाणी ग्रामस्थांनी थोडा हलगर्जीपणा दाखवल्याने ग्रामस्थांना त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
दरम्यान गावातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्राने गावातील सर्वच लोकांना तपासणी करण्यासाठी प्रेरित करण्यात आले त्यापैकी तब्बल आठ दिवसानंतर त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून १४४ लोक पॉझिटिव्ह आल्याचे दिसून आले आहे. पण सध्या गावात कोणालाही कसला त्रास नाही त्यामुळे वैद्यकीय अहवालात तसे दिसून आले असले तरी सध्या गावात तशी कोणतीच गंभीर परिस्थिती नाही असे त्यांनी सांगितले. तब्बल आठ दिवसानंतर या तपासणीचा अहवाल आल्यानंतर गावात १४४ पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय विभागाने जाहीर केले आहे हे चुकीचे आहे. याविरोधात ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी वैद्यकीय विभागाच्या बेजबाबदारपणा बद्दल आक्रोश व्यक्त केला आहे