प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाची दुसरी लाट येत असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने गुजरात सरकारने अहमदाबाद शहरात कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे विमानप्रवासावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. यापूर्वी बुकिंग केलेल्याच प्रवाशांना या काळात प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना विमान कंपन्यांकडून देण्यात येत आहेत.
बेळगावमधून स्टार एअर कंपनीकडून अहमदाबाद शहराला विमानसेवा देण्यात येते. व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाचे शहर असल्याने अहमदाबादला प्रवाशांची संख्या चांगली आहे. लॉकडाऊननंतरच्या काळात अहमदाबादला व्यापारामुळे जाणाऱया प्रवाशांच्या संख्येत वाढदेखील झाली होती. परंतु कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने गुजरात सरकारने या शहरात 3 दिवासांचा कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदाबादला प्रवास करणाऱया प्रवाशांना आपल्यासोबत ओळखपत्र घेऊन जावे लागणार आहे. तपासणीसाठी विमानतळावर काही काळ आधी उपस्थित राहावे लागणार असल्याचे स्टार एअरने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.









