सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना राजू शेट्टींचा दोन हात करण्याचा इशारा
विशेष प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी अहंकार सोडून एकरकमी एफआरपीची घोषणा करावी. अन्यथा शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस वळवतील आणि तुमचे कारखाने आजारी पडतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिला.
एकरकमी एफआरपी प्रश्नी सांगली जिल्ह्यात उसाच्या वाहनांच्या झालेल्या नुकसानीबाबत माजी खासदार शेट्टी यांचे मत विचारले असता ते बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले, कायदा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 24 कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केला आहे. ही रक्कम सांगली जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा कितीतरी अधिक आहे. सीमाभागातील आठ-दहा कारखान्यांनीही एफआरपी जाहीर केली आहे. असे असताना केवळ मी सांगतोय म्हणून दर द्यायचा नाही अशी भूमिका सांगली जिल्ह्यातील कारखानदार घेऊन शेतकऱ्यांना वेठीस धरत असतील तर निश्चितच शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर पेटवणे वगैरे प्रतिक्रिया उमटणार. आंदोलनात आम्ही हिंसेचा मार्ग पत्करत नाही पण जर शेतकऱ्यांची चळवळ दमणनितीच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात.
राजू शेट्टी पुढे म्हणाले ,अजूनही वेळ गेलेली नाही. सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी एकरकमी एफआरपी जाहीर करावी. नाहीतर एकदा सांगा की, सांगली जिल्ह्यातील कारखाने आजारी पडलेले आहेत. दर देऊ शकत नाहीत असेही स्पष्ट सांगावे. एका बाजूला आमचे कारखाने सुरू आहेत, आम्ही चांगला दर देतो असे सांगायचे आणि शेजारच्या जिल्ह्यापेक्षा कमी दर द्यायचा हे उद्योग आता बंद करा.
कारखान्यांना इशारा देताना शेट्टी म्हणाले की, अशा प्रकारातून एकदा जर सांगलीचा ऊस शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात वळवला तर सांगली जिल्ह्यातील कारखाने कितीही चांगले असले तरी आजारी पडल्या शिवाय राहणार नाहीत. याचे भान ठेवावे.
जिल्ह्यात आंदोलन पेटूनही कारखानदार दर का जाहीर करत नसावेत? असे विचारले असता शेट्टी म्हणाले, जाणीवपूर्वक शेतकरी चळवळ मोडून काढण्यासाठी सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीची घोषणा केली जात नाही. ही अहंकाराची भाषा आहे. त्यालाही एक दिवस निश्चितच उत्तर मिळेल. यावर्षी आम्ही थोडे बेसावध होतो पुढच्या वर्षी आम्ही तयारी करून मैदानात उतरू. मग तेव्हा कोणाची हिंमत असेल तर बघा दोन हात होऊनच जाऊदेत. असे आव्हानही शेट्टी यांनी यावेळी बोलताना दिले.









