मुंबई \ ऑनलाईन टीम
जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर नाराजी जाहीर केली. बुधवारी जलसंपदा विभागाच्या कामांची फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यावरून जयंत पाटील यांनी कुंटे यांना धारेवर धरले. असेच काम चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, असे देखील ते म्हणाले यानंतर महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. यावरच आज शिवेसना नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. कोणीही कितीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे. मजबूत आहे. कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल पण आमची भांडी काचेची नाही. ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत. ते महाविकासआघाडी मधील महत्त्वाचे मंत्री आहेत. अनुभवी नेते आहेत. त्यांनी काल स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत खुलासा केलाय जो अत्यंत महत्वाचा आहे. कॅबिनेटमध्ये काय घडलं? याबाबत बाहेर सांगू शकत नाही. चर्चा झाली असेल काही, असं सांगतानाच कोणीही कितीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे मजबूत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल पण आमची भांडी काचेची नाही. ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही. हमारे घर शीशे के नही है, कोई भी पत्थर मारे और टूट जाये, असं ते म्हणाले. महाविकास आघाडीत फूट असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. दरम्यान संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासंबंधी प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.
यावेळी त्यांनी देशातील कोरोना स्थितीवरून केंद्र सकारवर निशाणा साधला. तसेत देशात महाराष्ट्र मॉडेल राबवण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला.








