मॉस्कोपासून वॉशिंग्टनपर्यंत आणि दिल्लीपासून पॅरिसपर्यंत सबंध जग आज कोरोनामुळे अस्वस्थ आहे. कोरोनाविरोधातील ही लढाई सुरू असताना देशादेशातील आंदोलनांचा संसर्ग, सीमेवरील तणाव यामुळे संपूर्ण विश्वात प्रचंड उलथापालथ सुरू असल्याचे पहायला मिळते. त्यात महासत्ता अमेरिकेसह बहुतांश देशातील नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचा निष्कर्षही पुढे आला आहे. हे नक्कीच जगाचे आरोग्य बिघडल्याचे लक्षण मानावे लागेल. शारीरिक व मानसिकदृष्टय़ा सक्षम असलेली व्यक्तीच खऱया अर्थाने निरोगी मानली जाते. व्यक्तीचा हा नियम राज्यांना, देशांनाही लागू होतो. अमेरिकेसारख्या देशाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जगाच्या पाठीवरील सर्वात शक्तिशाली, सुखसंपन्न व परिपूर्ण देश अशी त्याची ओळख आहे. किंबहुना, आज सर्वच बाजूंनी अमेरिका घेरलेली दिसते. आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजेच लाखांहून अधिक लोकांचा अमेरिकेत कोरोनाने बळी गेला आहे. कोरोनाच्या झळांनी येथील शहरे लपेटलेली असतानाच या सर्वात मोठय़ा लोकशाहीप्रधान देशात वर्णद्वेषाची ठिणगी पेटते काय नि लोकशाहीचा मुडदा पडतो काय, हे सगळेच अस्वस्थ करणारे होय. ‘लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही,’ अशी लोकशाहीची साधी, सरळ व सुटसुटीत व्याख्या दस्तुरखुद्द अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनीच केली आहे. याच लिंकन यांनी गुलामगिरीविरोधात तीव्र लढा देत देशाला नवा विचार दिला. या विचारांमुळे अमेरिकेचा पाया भक्कम झाला. मात्र, या उदारमतवादी, सर्वसमावेशक परंपरेला छेद देण्याचे काम सध्या या देशात होत आहे. सांप्रत प्रकार हा त्यातलाच. मिनिओपोलिस शहरात जॉर्ज फ्लॉईड नावाच्या कृष्णवर्णिय नागरिकाची ज्या पद्धतीने हत्या झाली, तो क्रौर्याचा कळसच म्हणावा लागेल. एका दुकानातून खरेदी करून बाहेर पडलेल्या जॉर्ज यांनी बनावट नोट दिल्याचा साक्षात्कार दुकानदार नि गोऱया पोलिसाला होतो काय नि गुडघा मानेवर दाबून हा पोलीस गुदमरेपर्यंत जॉर्ज यांना नृशंसपणे कचाटय़ात पकडून ठेवतो काय, हे धक्कादायक नव्हे, तर येथील संकुचित दृष्टिकोन अद्यापही कायमच असल्याचेच अधोरेखित करतो. या विरोधात मागच्या काही दिवसांपासून येथील विविध शहरांमध्ये तीव्र आंदोलने सुरू असून, स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊसच्या खंदकाचा आश्रय घ्यावा लागला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पुढच्या काळात येथील परिस्थिती आणखी बिघडू शकते. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाल्यापासून अमेरिकेची घडी अनेक आघाडय़ांवर विस्कटलेली दिसते. त्यांची वादग्रस्ते वक्तव्ये, वागण्या बोलण्यातील उथळपणा, उफराटा कारभार, धोरणे या गोष्टी अमेरिकेला मागेच नेणाऱया ठरल्या आहेत. हे प्रकरण हाताळण्यात त्यांना अपयश आले, असे कुणी म्हणेल. परंतु, जे नेतृत्वच कृष्णवर्णियांबद्दल आपपरभाव बाळगत असेल, त्याच्याबद्दल इतकी सौम्य टिप्पणी न्यायोचित ठरणार नाही. ट्रम्प यांनी यापूर्वी केलेली वर्णभेदी विधाने पाहता त्यांच्या मनात कृष्णवर्णीयाबद्दल एकप्रकारचा आकसच दिसून येतो. ही आकसबुद्धी सोडून ट्रम्प यांनी सर्वसमावेश व्हावे, ही अपेक्षा करणे हा तसा भाबडेपणाच. परंतु, या प्रकरणाच्या निमित्ताने अवघ्या जगात अमेरिकेची होत असलेली नाचक्की पाहता आता तरी या महोदयांनी संकुचित धोरण सोडावे. अन्यथा, या देशातील अस्वस्थताच त्यांचा घात करेल. दुसऱया बाजूला अमेरिकेमधील सर्व घटकांच्या मानसिक स्वास्थ्यावरही कोरोनाने जबर आघात केल्याचा अहवाल अमेरिकी मानसशास्त्रीय संघटनेने प्रसिद्ध झाला आहे. यात 67 टक्के लोक संसर्गाचा सामना करण्याच्या सरकारी पद्धतीसंदर्भात चिंतीत असणे, यातूनच ट्रम्प यांच्यावरील त्यांचा विश्वास प्रकट होतो. याशिवाय एक तृतियांशपेक्षाही अधिक लोकांमध्ये नैराश्य, 70 टक्के लोकांच्या मनावर दाटलेली अर्थव्यवस्थेची काळजी, 50 टक्के लोकांचा मानसिक आरोग्यावर सुरू असलेला ऊहापोह, पाचातील एकाच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम या सगळय़ा बाबी मानसिक आजारांचा धोकाच दर्शवितात. कमी अधिक प्रमाणात आज अनेक देशात हीच स्थिती आहे. चीनसारख्या देशाने संबंधित विषाणू, तेथील डॉक्टरांचा इशारा, कोरोना बळींचा आकडा येथपासून सगळय़ाच गोष्टी दडवल्या आहेत. कारण लोकशाही नव्हे; तर दडपशाही हा येथील व्यवस्थेचा गाभा आहे. म्हणून तिथे सर्व काही आलबेल आहे, असे समजण्याचे कारण नाही. भारत व चीन सीमेवर उभय देशांचे सैन्य आमनेसामने आले असून, कुरोपतखोर चीनमुळे पुन्हा युद्धाचे ढग पसरताना दिसतात. लक्ष अन्यत्र वळविण्याचाच हा प्रयत्न असावा. चीनच्या संगतीने नेपाळही बिघडल्यात जमा आहे. तिकडे चिनी दडपशाहीविरोधात हाँगकाँगमध्ये आंदोलने सुरू आहेत. लंडन, फ्रान्समध्येही निदर्शने झाली. यातून संसर्ग वाढण्याचा धोका व्यक्त होतो आहे. हे पाहता या देशांतील सरकारला ही प्रकरणे नाजूकपणे व तितक्याच कौशल्याने हाताळावी लागतील. भारतातही कोरोनाचे गंभीर परिणाम जाणवत असून, लॉकडाऊनच्या काळात 25 ते 30 टक्क्यांवर लोक बेरोजगार झाल्याची माहिती पुढे आली आहे. येथील अर्थकारण सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले असले, तरी ते प्रामुख्याने कर्जाधारित आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकरिता ते फारसे लाभदायी ठरण्याची शक्यता नाही. स्वाभाविकच पुढच्या टप्प्यात भविष्याबाबत जनमानसाच्या मनातील अस्वस्थता अधिक वाढू शकते. पावसाने कृपा केल्यास काही अंशी का होईना निश्चित दिलासा मिळेल. कोरोनाने जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. माणसापुढे, देशांपुढे नवी आव्हाने उभी राहिली आहेत. वेगवेगळय़ा पातळय़ांवरची अस्वस्थता वा त्यांचा वाढता संसर्ग हे त्यातील सर्वात मोठे आव्हान होय. म्हणून निरोगी व स्वस्थ जगासाठी सर्वांना एक पाऊल पुढे टाकावे लागेल. परस्परांतील वाद वा भेट मिटवून सर्व देश एकवटले, तर महामारीविरूद्धचे युद्ध जिंकणे अशक्य नाही. निसर्ग व पर्यावरणाच्या सन्मानाचा अंतर्भाव असलेले नागरीकरण, स्वच्छता वा जीवनशैलीचे नवे मॉडेलच जगाला निरामय आणि आत्मनिर्भर बनवेल.
Previous Articleलॉकडाऊनमध्ये हरिदास
Next Article विप्रोचे संस्थापक-मुलगा कमाईतील हिस्सा घेणार नाहीत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








