कोविड-19 च्या गर्तेत सारे जग अडकले आहे. भारताला 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आर्थिक पॅकेजही सरकारने जाहीर केले आहे. संपूर्ण जगाच्या तुलनेत आपल्या देशात कोविड-19 वर अजूनपर्यंत तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम शेअरबाजारावर दिसतील, असे वाटत होते. पण अमेरिकेत कोरोनाचे 1 लाखाहून अधिक संक्रमित रूग्ण असल्याचे आढळून आल्यावर पुन्हा शेअरबाजार अस्थिर झाला. शुक्रवारी आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शेअरबाजारात चढ-उतार झाले आणि सेंसेक्स 131 अंक घसरला. मात्र निफ्टीने 19 अंकाची तेजी दर्शविली. एकूण शेअरबाजारातील वातावरण अद्याप अस्थिर आहे आणि पुढील काही काळ अस्थिरच राहील. असे वाटत आहे.
पुढील आठवडय़ाची सुरुवात होईल तेव्हा चालू आर्थिक वर्ष संपायला अवघे दोन दिवस उरलेले असतील. कोरोना विषाणूने संपूर्ण जगात माजविलेला हाहाकार आणि त्यामुळे अस्ताव्यस्त झालेली आर्थिक व्यवस्था घेऊन आपण 2020-21 या आर्थिक वर्षात पदार्पण करीत आहोत. शेअरबाजाराची स्थितीही त्यामुळे अस्थिर आहे. म्हणून पुढील काही काळ तरी सावधगिरी बाळगूनच व्यवहार करणे आवश्यक आहे. सध्याच्या अस्थिरतेला घाबरून शेअरबाजारातून पळ काढणे जितके मूर्खपणाचे ठरेल तितकेच स्टॉक्सच्या किमती घसरल्या आहेत म्हणून आंधळेपणाने खरेदी करत सुटणेही मूर्खपणाचे ठरेल. अत्यंत हुशारीने आणि सावधगिरीने ट्रेडिंग केले तर सध्याच्या परिस्थितीतही शेअरबाजारातून आपल्याला कमाई करता येईल. नोव्हेंबर 2008 मध्ये मंदीच्या भीतीने शेअरबाजाराची जी घाबरगुंडी उडाली होती, तशीच साधारण आता परिस्थिती आहे. पण त्या वेळच्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत फरक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यावेळी आर्थिक मंदीच्या स्थितीचा अंदाज घेता येत होता. पण सध्याची स्थिती तशी नाही. सध्याची परिस्थिती पुढे सावरेल की आणखी बिघडेल, ती किती काळ तशी राहील, याचा कोणताच अंदाज आता बांधता येत नसल्याने शेअरबाजारातही काहीही निर्णायक होताना दिसत नाही. शिवाय कोरोना विषाणूची भीती किती काळ बाळगायची हेही माहीत नाही. म्हणूनच यापुढील काळात सावध राहूनच ट्रेडिंग करणे जास्त सोयीस्कर ठरेल.
अर्थात अवतीभवती इतके नकारात्मक वातावरण असतानाही काही सकारात्मक बाबी घडल्या आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. भारताच्यादृष्टीने ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. देशाच्या आर्थिक स्थितीला दिलासा देणारी, करंट अकाऊंट, राजकोषीय, चलनवाढ आणि व्याजदर या सगळय़ाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत सकारात्मक आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारला सध्याच्या स्थितीतही योग्य कारणासाठी आर्थिक तरतूद करता येणे शक्य झाले आहे.
दुसरे म्हणजे स्टॉक्सच्या किमती एकदम घसरल्यामुळे त्यांची मागणी वाढण्याचीही शक्यता आहे. निफ्टी गेले अनेक दिवस तेजीतच व्यवहार करत होता. आता सवलतीच्या दरात तो उपलब्ध झाला आहे. त्यामुळेच परिस्थितीचा अंदाज लागणे अवघड असले तरी शेअरबाजारात गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी स्थिती आहे.
पण सध्याच्या स्थितीत कुणीही गुंतवणूक करण्यास धजावताना दिसत नाही. नकारात्मकतेचा परिणाम एवढा आहे की शेअरबाजारातून बाहेर पडण्याचाच निर्णय अनेक गुंतवणूकदार घेत आहेत. पण अशा स्थितीत घाबरून काही निर्णय घेण्यापेक्षा थोडा वेळ थांबणे इष्ट असते. थांबणे म्हणजे ट्रेडिंग थांबवणे नव्हे तर सध्याच्या दराप्रमाणे हळूहळू खरेदी करत राहणे. आश्वासक स्टॉक्समध्ये खरेदी करत राहणे हाच आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा उपाय आहे.
थोडक्यात शेअरबाजारांची खरेदी कसोटी पुढील आठवडय़ात लागणार आहे. पुढील आठवडय़ात कोरोनाचे संक्रमण वाढते की त्यावर नियंत्रण आणण्यात यश येते यावर शेअरबाजारांची चाल निश्चित होईल. गुंतवणूकदारांसाठी सध्या कठीण काळ आहे. पण त्यांनी संयम सोडता कामा नये. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यात यश आले तर त्याचा खूप चांगला परिणाम शेअरबाजारांवर होईल. पण परिस्थिती आणखी बिघडली तर मात्र शेअरबाजारात पुन्हा अस्थिरता आणि भीतीचे वातावरण राहील.सध्याच्या परिस्थितीत हेल्थकेअर आणि फार्मा स्टॉक्स खूप आकर्षक आहेत. कारण सध्या या उत्पादनांचीच जास्त गरज आहे. शिवाय सध्या आरोग्याच्या दृष्टीने निर्माण झालेली आणीबाणी पाहता पुढील काळात भारतासह जगातील सर्वच राष्ट्रे हेल्थकेअर या क्षेत्रात जास्त आर्थिक तरतूद करतील अशी अपेक्षा आहे. निफ्टी आता 8660 अंकांवर बंद झाला आहे. एप्रिलमध्ये निफ्टी पुन्हा एकदा दहा हजाराचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला तर शेअरबाजारात पुन्हा एकदा आश्वासकता निर्माण होईल.
– संदीप पाटील,
शेअरबाजार अभ्यासक









