कोरोना विषाणूच्या विरोधात शरीरात पूर्वीच अस्तित्वात असलेल्या अँटीबॉडीची भूमिका दिसून आली आहे. एका नव्या अध्ययनात वैज्ञानिकांना सामान्य सर्दी-खोकल्यादरम्यान इम्यून सिस्टीमद्वारे निर्माण करण्यात आलेल्या काही अँटीबॉडी कोविड-19लाही लक्ष्य करू शकतात, असे आढळून आले आहे. या घातक विषाणूपासून बचावही करू शकतात.
विषाणू संक्रमणाला रोखण्यासाठी प्रतिकारक क्षमता अँटीबॉडीची निर्मिती करते. अशाप्रकारच्या अँटीबॉडी एका कालावधीपर्यंत रक्तात राहतात आणि पुन्हा संक्रमणापासून बचाव करतात, असे ब्रिटनच्या फ्रान्सिस क्रिक इन्स्टीटय़ूटच्या संशोधकांनी म्हटले आहे.
सायन्स नियतकालिकात प्रकाशित या अध्ययनानुसार कधीच कोरोनाबाधित न झालेल्या काही लोकांमध्ये विशेषकरून मुलांच्या रक्तात या धोकादायक विषाणूसंबंधी अँटीबॉडीची प्रतिक्रिया संशोधकांना दिसून आली आहे. अशा लोकांमध्ये सामान्य सर्दीच्या परिणामी अशाप्रकारची अँटीबॉडी निर्माण झाली असल्याची शक्यता आहे. हा निष्कर्ष कोविड-19 बाधित आणि सामान्य लोकांच्या रक्तनमुन्यांच्या विश्लेषणाच्या आधारावर काढण्यात आला आहे.
संशोधकांना अशा लोकांच्या रक्तात अँटीबॉडीचे अस्तित्व दिसून आले, जे कोविड-19 ने बाधित झाले नवहते. त्यांनी या निष्कर्षांची पुष्टी मिळावी याकरता महामारीपूर्वी एकत्र करण्यात आलेल्या 300 हून अधिक रक्तनमुन्यांचीही चाचणी केली आहे. प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये अशाप्रकारच्या अँटीबॉडीच्या अस्तित्वाची शक्यता अधिक असते. हे चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी अधिक अध्ययनाची गरज असल्याचे फ्रान्सिस क्रिक इन्स्टीटय़ूटचे प्रमुख संशोधक केविन एनजी यांनी म्हटले आहे.









