पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती : पडवे हॉस्पिटलचा पाहणी अहवाल स्वॅब नमुने तपासणीकरिता प्रतिकूल
राणेंविरोधात भाजपकडूनच षड्यंत्र रचले जात असल्याची शंका!
वार्ताहर / कणकवली:
जिल्हय़ात कोरोना स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत विरोधकांकडून पडवे येथील नारायण राणेंच्या हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेचा पर्याय देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांना पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश मी दिले होते. त्यांनी तसा अहवाल सादर केला आहे. या अहवालात पडवे हॉस्पिटलमध्ये या प्रयोगशाळेसाठी आवश्यक त्या सुविधा नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे कोविड 19 च्या स्वॅब तपासणीची प्रयोगशाळा सुरू होऊ शकत नाही, असे म्हणण्यात आले आहे. या हॉस्पिटलमधील या सुविधा नसलेल्या बाबी जनतेसमोर याव्यात म्हणून भाजपच्या काही जणांकडून हा मुद्दा पुन्हा-पुन्हा काढला जात असून राणेंविरोधात षडयंत्र रचले जातेय, अशी शंका पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
येथील ‘विजयभवन’मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, राजू राठोड, ऍड. हर्षद गावडे आदी उपस्थित होते.
पडवेत आवश्यक साधनेच नाहीत!
सामंत म्हणाले, भाजपचे जे आमदार व शिष्टमंडळ जिल्हा दौऱयावर आले आहेत, ते केवळ विरोधासाठी विरोध, अशी यंत्रणा राबवित आहे. जिल्हय़ात कोरोना निवारणासाठी कुणाचाही निधी आला, तरी त्याला आमचा विरोध असणार नाही. पण ज्या गोव्यात भाजपचे सरकार आहे, तेथेही सुरुवातीला स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळा नव्हती. रुग्णसंख्या वाढू लागली, तेव्हा तेथे प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. पडवे येथील हॉस्पिटलमध्ये स्वॅब तपासणीसाठी आवश्यक साधने नाहीत.
एक कोटी निधीबाबत फसवणूक
जिल्हय़ात ही प्रयोगशाळा होण्यासाठी भाजपच्या आमदारांनी प्रत्येकी 20 लाख याप्रमाणे 1 कोटीचा निधी देण्याचे जाहीर केले. तसे पत्रही त्यांनी दिले. मात्र, ही जिल्हावासियांची दिशाभूल व फसवणूक आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयाला आमदार निधी देता येत नाही. याबाबत मी जिल्हा नियोजन अधिकाऱयांशी चर्चा केली, जरी पत्र दिले, तरी हा निधी प्रशासकीयदृष्टय़ा वर्ग होणार नाही. हे विरोधी पक्ष नेत्यांसोबत अन्य आमदारांनाही माहिती आहे.
डीपीडीसीतून पडवेत निधी शक्य!
पडवे हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणीची प्रयोगशाळा करण्यासाठी डीपीडीसीच्या निधीची मागणी करण्यात आली, तर पालकमंत्री म्हणून हा निधी देईन. रत्नागिरीत वालावलकर हॉस्पिटलमध्ये असा निधी देण्यात आला. पण त्यांनी शासनासोबत करार केला आहे. त्या प्रयोगशाळेवर सरकारचे नियंत्रण असणार आहे. राणेंच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकाऱयांनी दिलेल्या अहवालानुसार तेथे आवश्यक असणारी आरटीपीसीआर मशीन आदी साहित्य नाही. त्या कॉलेजमध्ये स्वतंत्र मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा नाही. तेथील तंत्रज्ञही बीएससी असून त्यांना मोलोक्युलर, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेतील कामाचा अनुभव नाही. प्रयोगशाळेला एनएबीएल ऍक्रिडेशन केलेले नाही. त्यामुळे येथे कोविड 19 प्रयोगशाळा होऊ शकत नाही. तरीही राणे हॉस्पिटलची प्रयोगशाळा सरकारकडे देत असतील, तर आमचा त्याला आक्षेप नाही. मात्र त्यासाठी आयसीएमआरच्या निकषांची पूर्तता करायला हवी, असे सामंत म्हणाले.
खापर शिवसेनेवर फोडण्याचा प्रयत्न!
भाजपकडून सध्या खोटं करायचं व झालं नाही की, त्याचं खापर शिवसेनेवर फोडायचं, असा प्रकार सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत 27 हजार चाकरमानी जिल्हय़ात आले. येत्या काळात चाकरमान्यांना मुंबईतून टप्प्याटप्प्याने आणण्यासाठी एसटी सेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. जेणेकरून जिल्हय़ातील जनतेच्या आरोग्याला बाधा येऊ नये, अशी आमची भूमिका आहे.
येऱया-गबाळ्य़ांच्या उपदेशाची गरज नाही!
जिल्हय़ातील ज्या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, ती प्रिटिंग मिस्टेक होती. त्याचा जिल्हा प्रशासनाशी संबंध नाही. प्रिंटिंग मिस्टेक लक्षात आल्यानंतर त्या हॉस्पिटलकडून ती सुधारण्यात आली. मात्र, या विषयाचेही राजकारण करण्यात येत आहे. आरोग्य अधिकारी व प्रशासनावर भाजपकडून संशय घेण्यात येत आहे. आताचे जे अधिकारी आहेत, तेच अधिकारी भाजपची सत्ता असताना होते. मात्र, आता भाजपचा चष्मा बदलला आहे. त्यामुळे अधिकारी व प्रशासन चुकीचे दिसतेय. कोकणवासीय हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आहेत. त्यामुळे शिवसेनेला येऱया-गबाळ्य़ांच्या उपदेशाची गरज नसल्याचा टोला सामंत यांनी लगावला.
काविड 19 च्या काळात लोकांना राजकारण आवडत नाही. राजकीय मतभेद असले, तरी उदय सामंत यांनी राणेंना फोन केला. राजकारणासाठी जिल्हय़ात आलेल्या भाजपच्या प्रमोद जठार यांनी आता तरी जिल्हय़ातच राहवे. बाहेर जाऊ नये. कोरोना कालावधीत पालकमंत्र्यांनी जिल्हय़ातच राहवे, अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. येत्या काळात खासदार विनायक राऊतही जिल्हय़ात येणार आहेत, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
गडकरींचे न ऐकणारी भाजप!
मुंबईकरांना जिल्हय़ात घेण्यास कुणीच विरोध केला नाही पण विनापास कुणी जिल्हय़ात येऊ नये, अशी भूमिका सरपंचांनीही घेतली आहे. कोरोनाच्या काळात केवळ राजकारण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. जिल्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शून्यावर येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अशावेळी भाजपची आंदोलने कशाला? केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही कोरोनाच्या काळात कुणी राजकीय डमरू वाजवू नये, असा सल्ला दिला होता. मात्र, गडकरींचे न ऐकणारी भाजप राज्यात असल्याचा टोला सामंत यांनी लगावला.









