पुण्यातील ‘सिरम इन्स्टिटय़ूट’ने कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकल्याने कोरोनाच्या विषाणूविरुद्धची लढाई पुढच्या टप्प्यात निर्णायक वळणावर पोहोचेल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. कोरोनाने जगातील 200 हून अधिक देशांना विळखा घातला असून, जवळपास दोन ते सव्वा दोन लाख नागरिकांचा बळी घेतला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून, जगभरातील शास्त्रज्ञांकडून कोरोनावर औषध वा लस शोधण्याच्या दृष्टीने विविध प्रयोग सुरू आहेत. त्याबाबतच्या संशोधनात ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत सिरमनेही पुढाकार घेतला असून, हा प्रयोग यशस्वी होण्याची अपेक्षा आहे. ऑक्सफर्डने बनविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्या सध्या मानवावर करण्यात येत आहेत. त्यासंदर्भात परिणाम यायला साधारणपणे सप्टेंबरपर्यंत अवधी लागण्याची शक्यता आहे. हे पाहता आणखी काही काळ वाट पहावी लागेल. मात्र, लसीचे परिणाम येईतोवर प्रतीक्षा केल्यास आणखी सहा महिन्यांपर्यंत थांबावे लागू शकते. स्वाभाविकच हा विलंब अनेकांच्या दृष्टीने जीवघेणा ठरेल. त्यामुळे सिरमने त्याआधीच लस निर्मितीचा घेतलेला निर्णय हा लोकहिताचाच म्हणायला हवा. वैद्यकीय क्षेत्रात जोखीम ही घ्यावीच लागते. कोणताही प्रयोग वा संशोधन याला अपवाद नाही. त्यादृष्टीने ऑक्सफर्ड, सिरमसह जगभरातील संशोधक कौतुकास पात्र ठरतात. सिरमने दाखवलेले प्रसंगावधानही असेच अभिनंदनीय. वैद्यक क्षेत्रात या संस्थेचे योगदान अतुलनीय असेच आहे. वैद्यकीय क्षेत्राला अलीकडच्या काळात धंदेवाईक स्वरूप आले आहे. किंबहुना, सिरमसारख्या संस्था आजही निरोगी व सेवाभावी दृष्टीकोनातून काम करतात, हे दिलासादायक होय. संस्थेने इतर लशींवरील चालू प्रकल्पातील उत्पादनाला छेद देऊन त्यामध्ये कोविड 19 लस निर्मिती करण्याचा घेतलेला निर्णय हाही त्यांच्यातील वैद्यकीय व सामाजिक भानच अधोरेखित करतो. या निर्णयामुळे सिरमला नुकसानदेखील संभवते. परंतु, कार्य तडीस न्यायचा उद्देश डीएनएमध्ये असलेली ही आरोग्यवर्धिनी मागे हटणार नाही, हे निश्चित आहे. आता मेपासून पुण्यात लसनिर्मिती होणार असून, सप्टेंबरपर्यंत चार कोटी लस तयार केल्या जातील, असे सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले आहे. ठोस उपचार वा उपायाच्या दिशेनेच ही वाटचाल म्हटली पाहिजे. मुख्य म्हणजे या लसीचा दर वाजवी म्हणजेच एक हजार रुपयांपर्यंत असणार आहे. परदेशात विविध आजारांच्या लसींची किंमत ही भारतापेक्षा आठ ते दहा पट अधिक असल्याचे सांगितले जाते. कोरोनाबाबतही हीच शक्यता असेल. पण पूनावाला यांनी नफेखोरी नव्हे, तर वैद्यकसेवा हा संस्थेचा मूल स्रोत असल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यांचा लौकिक बघता हे यथार्थच म्हणावे लागेल. स्वाभाविकच ही लस सर्वसामान्यांनाही परवडू शकेल. म्हणूनच हा प्रयोग सफल व संपूर्ण होणे एकूणच देश, जग व आपल्या मानवजातीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. सध्या पुण्यासारख्या शहराला विशेषत: मध्य भागाला कोरोनाने एकप्रकारे वेढाच घातला आहे. पुण्यात कोरोना संक्रमणाचा वेग देशभरात सर्वाधिक असल्याचा अहवाल केंद्रीय पथकाने प्रसृत केला आहे. देशातील 23 व्यक्तींमागे 1 कोरोनाबाधित आढळत असताना पुण्यात हेच प्रमाण 9 व्यक्तींमागे 1 असणे अथवा आठवडय़ात रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढणे, यातून पुण्यातील गंभीर स्थितीची कल्पना येईल. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने म्हटल्याप्रमाणे चाचण्यांचे प्रमाण वाढवावे लागेल. मॉर्निंग वॉकवाले तसेच भाजीपाला बहाद्दरांनीही आता थोडे सबुरीने घ्यावे. पुण्यातील दाट लोकवस्तीमधील 71 हजार कुटुंबांचे स्थलांतर करण्याची तयारीही पालिकेने सुरू केली आहे. विषाणूच्या संसर्गाचा झपाटा पाहता ही खबरदारी योग्यच. 3 मे रोजी देशातील लॉकडाऊन संपुष्टात येत असला, तरी ग्रीन झोनमध्ये टाळेबंदीत वाढ होण्याचा संभव आहे. वेळ कठीण आहे. परंतु, न डगमगता परीक्षा द्यावीच लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या व्हीडिओ कान्फरन्सिंगच्या बैठकीत अनेक राज्यांनी आर्थिक साहय़ाची मागणी केली आहे. लॉकडाऊनने राज्याच्या उत्पन्नालाच ब्रेक लागल्याने त्यांच्यापुढे अनेकविध आव्हाने उभी राहिलेली दिसतात. त्यामुळे केंद्राकडून मदत मिळणे अत्यावश्यक ठरते. ही वेळ वादाची नव्हे तर संवादाची आहे. केंद्र व राज्य यांच्यातील परस्पर समन्वय व सहकार्यातूनच या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडता येईल. दुसरीकडे चीनमधून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असलेल्या 200 हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्या आपला मोर्चा भारताकडे वळविण्याची शक्यता आहे. त्यांच्या स्वागतासाठी तयार राहण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. अर्थात कोणत्याही संकटात संधीचे द्वार किलकिले का होईना उघडे राहतेच. त्यामुळे या महामारीतही अशी संधी निश्चितपणे चालून येऊ शकेल. तथापि, ती साधण्यासाठी योग्य ती वातावरणनिर्मिती, तयारी ठेवावी लागेल. आज सगळे जगच थांबल्यासारखे झाल्याने त्याचा सर्वच क्षेत्रांवर परिणाम होणे साहजिकच होय. मात्र, ही स्थिती कायम राहील, असे नव्हे. असाध्य ते साध्य करिता सायास । असे संत तुकाराम महाराज म्हणतात. आव्हान कोरोना संकटाचे, लस निर्मितीचे असो अथवा सामाजिक वा आर्थिक परिणामांचे. हातावर हात ठेवून किंवा हताश होऊन त्यावर मात करता येणार नाही. त्यासाठी सायासच करावे लागतील. कोरोनाचा खात्मा करण्यासाठी अजून बराच वेळ असल्याचे जागतिक आरोग्य संघटना म्हणते. त्यात या विषाणूचा अवतार बदलही समोर येत आहे. लढाई दीर्घ पल्ल्याची नि मानवी अस्तित्वाची आहे. बरेच काही गमवावे लागणार असले, तरी काही गोष्टी कमावताही येतील. हे मिशन जिंकण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्नरत राहुयात.
Previous Articleहरिदासचा फेटफटका
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








