वृत्तसंस्था/ नवी मुंबई
2023 साली फिफाच्या होणाऱया महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा प्ले ऑफसाठी येथे सुरू असलेल्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील शुक्रवारच्या सामन्यात चिनी तैपेई संघाने थायलंडचा 3-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे आता चिनी तैपेई आणि व्हिएतनाम यांच्यात अंतिम लढत होईल.
फिफाची आगामी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त विद्यमाने भरविली जाणार आहे. आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत रविवारी चिनी तैपेई आणि व्हिएतनाम यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार असून या सामन्यातील विजयी संघ आगामी विश्वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धेसाठी थेट पात्र ठरेल. आंतरखंडीय कॉन्फेडरेशन फुटबॉल स्पर्धेतील प्लेऑफ लढतीतील निर्णयावर थायलंड संघाचे विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या आशा अवलंबून राहतील. शुक्रवारी झालेल्या सामन्यात चिनी तैपेई संघाला 3 गुण मिळाले.
या स्पर्धेतील राऊंड रॉबिन प्लेऑफमधील गेल्या बुधवारी झालेल्या पहिल्या लढतीत व्हिएतनामने थायलंडचा पराभव केला होता. आता थायलंड संघाला चिनी तैपेई आणि व्हिएतनाम यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. कोरोना महामारी समस्येमुळे थायलंड संघातील बऱयाच खेळाडूंना या सामन्यात खेळता आले नाही.
शुक्रवारच्या सामन्यात 14 व्या मिनिटाला थायलंडला पंचांनी पहिल्यांदा फ्रि कीक बहाल केली. पण या संधीचा त्यांना फायदा उठवता आला नाही. चीन तैपेईच्या गोलरक्षकाची कामगिरी या सामन्यात अत्यंत भक्कम झाली. मध्यंतराला पाच मिनिटे बाकी असताना तैपेईचा पहिला गोल सू हेसुआनने नोंदविला. मध्यंतरावेळी तैपेईने 1-0 अशी आघाडी थायलंडवर मिळविली होती. 84 व्या मिनिटाला सू हेसुआनने संघाचा आणि आपला वैयक्तिक दुसरा गोल केला. 89 व्या मिनिटाला तैपेईचा तिसरा गोल फ्रि कीकवर चेनहुईने नोंदविला. थायलंडला या सामन्यात शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही.









