पृथ्वीवरील महत्त्वाच्या घटनांची होणार नोंद
विमानांच्या ब्लॅकबॉक्सविषयी तुम्ही सर्वांनीच ऐकले असेल, पण आता पृथ्वीचा देखील ब्लॅकबॉक्स तयार केला जाणार आहे. पृथ्वीचा हा ब्लॅक बॉक्स हवामान बदल आणि अन्य मानवनिर्मित धोक्यांची नोंद ठेवणार आहे. मानवी संस्कृतीच्या पतनाची कहाणी देखील नोंदविणार आहे. हा ब्लॅक बॉक्स सुमारे 32 फूट लांबीचा असेल आणि कधीच न तुटणाऱया स्टीलद्वारे तयार केला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या टास्मानियामध्ये तो तयार केला जाईल.
या स्टीलच्या ब्लॅक बॉक्सला हार्ड ड्राइव्हने भरले जाईल, ज्यात पृथ्वीच्या विनाशाबद्दल ‘कुठल्याही पक्षपाता’शिवाय पूर्ण तपशील नोंदविण्यात येणार आहे. हा ब्लॅक बॉक्स हवामान बदलामुळे तापमान, समुद्राची पातळी, हवामानातील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण आणि अन्य अनेक आकडेवारी प्राप्त करेल, जेणेकरून हवामानाचे संकट रोखण्यास माणूस कशाप्रकारे अपयशी ठरला याचे दस्तऐवजीकरण करता येईल.
सौरऊर्जेने संचालित
पृथ्वीचा विनाश झाला आणि यातून कुणी वाचल्यास तो या ब्लॅक बॉक्सचा वापर कसा करणार यावर वैज्ञानिक सध्या काम करत आहेत. माणसांचा एक छोटा समूह वाचू शकतो आणि कशाप्रकारे भीषण आग, पूर आणि दुष्काळाने मानवी सृष्टीचा अंत झाला हे तो जाणू शकेल असे मानले जाते. सौर ऊर्जेने संचालित होणाऱया या ब्लॅक बॉक्ससाठी किती खर्च होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुढील वर्षापासून निर्मिती
या ब्लॅक बॉक्सची निर्मिती 2022 पासून होणार आहे. 1968 मध्ये प्रदर्शित ‘2001ः ए स्पेस ओडिसी’ या चित्रपटात ब्लॅक मोनोलिथ दर्शविण्यात आले होते, त्याचप्रकारचा हा ब्लॅक बॉक्स असणार आहे. मार्केटिंग कंपनी क्लेमेंगर बीबीडीओ अन् युनिव्हर्सिटी ऑफ टास्मानियाकडून या प्रकल्पाची निर्मिती होतेय. पृथ्वीवरील मानवी जीवन आगामी काळात संपुष्टात आल्यास वाचणाऱया लोकांना नेमके काय घडले होते हे समजावे हा यामागचा उद्देश आहे.
टास्मानियाची निवड
हा ब्लॅक बॉक्स माल्टा, नॉर्वे आणि कतारमध्ये ठेवण्याची चर्चा झाली होती, पण टास्मानियाची भूराजकीय आणि भूभर्गीय स्थिरता अधिक चांगली आढळून आली. टास्मानियात सूर्य उगवताच सौर ऊर्जेच्या मदतीने वैज्ञानिक आकडे नोंद होणार असल्याचे सांगण्यात येते. यात सागराची पातळी, तापमान, समुद्रातील आम्लीकरण, कार्बन डाय ऑक्साइड, जीवांचा अंत, जगातील विविध ठिकाणांवरील जमिनींच्या वापरात बदल इत्यादी माहिती सामील असेल.









