कोरोना विषाणूमुळे लग्नसमारंभाच्या आयोजनावर बर्याच मर्यादा आल्या आहेत. आता लग्न धुमधडाक्यात होत नाहीत. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत, साधेपणाने लग्न संपन्न होत आहेत. सोशल डिस्टंसिंग, मास्क, प्रवासावरील बंधनं यामुळे सगळ्यांचाच नाईलाज झाला आहे. कार्यक्रमांवरील बंधनं हळूहळू शिथिल होत असली तरी आपल्याला काळजी घ्यायलाच हवी. पाहुण्यांना वगळ्यास रुसवेफुगवे वाढू शकतात. मात्र तुम्ही ऑनलाईन सहभागासाठी त्यांना आमंत्रण देऊ शकता.
कोरोना काळात लग्नसमारंभांचं रुपडं बदललं आहे. पाहुणे झूमवरून लग्नाचा आनंद घेतात. मेहंदी, संगीतसारखे कार्यक्रमही अशाच पद्धतीचे आयोजित होतात. इतकंच काय तर घरी बसूनच नवरानवरीसोबत फोटो काढला जातो. त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीचं निमंत्रण पाठवू शकता. आपण प्रत्यक्षात आला असतात तर आम्हाला निश्चितच आनंद झाला असता. मात्र कोरोना महामारीमुळे तुम्ही झूमच्या माध्यमातून लग्नात सहभागी व्हा, अशा आशयाचं निमंत्रण पाठवता येईल. एका घरातल्या एक किंवा दोन जणांनी यायची विनंती करा. अनोखळी लोकांना लग्नस्थळी न आणण्याबाबत सूचना द्या. अर्थात हे सगळं करताना परिस्थितीची अगदी नीट कल्पना द्या.
मुळात कमी निमंत्रणं पाठवा. कुटुंबिय तसंच अगदी जवळच्या आप्तांनाच प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची परवानगी द्या. इतरांना झूमच्या माध्यमातूनच सोहळ्यात सहभागी करून घ्या. लग्नातल्या सोशल डिस्टंस्टिंगच्या नियमांची माहिती आधिक करून द्या. मास्क घालणं किती आवश्यक आहे, हेही समजवा. यामुळे तुमच्या लग्नात कोणतेही अडथळे येणार नाहीत.









