सोलापूर / प्रतिनिधी
महाआघाडी सरकारची वर्षपूर्ती झाली तरी मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. या सरकारला केवळ योजना स्थगिती सरकार म्हणता येईल. अनैसर्गिक युती देशाच्या इतिहासात फार काळ टिकणार नाही. असंगातून तयार झालेला संघ म्हणजेच महाआघाडी सरकार आहे. सरकार वर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाच्या भूमिकेतही भाजप सक्षम असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महाघाडीवर सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले.
पुणे विभागीय पदवीधर मतदार संघाचे संग्राम देशमुख व शिक्षक मतदार संघाचे जितेंद्र पवार या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापूर दौर्या दरम्यान हेरिटेज गार्डन येथे पत्रकार परिषद घेतले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी खा. डॉ. जयसिध्देश्वर महाराज, आ. विजय देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. राम सातपुते, महापौर श्रीकांचना यन्नम आदी उपस्थित होते़ फडणवीस पुढे म्हणाले की, महाआघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. नुकतेच झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा विसर पडला, त्यांना जनतेच्या आश्वासनांची जाण कशी असणार? वीज चौकशी, ईडीची सीडी हे सगळं त्यांनीच करावे. महाआघाडीतील मंत्री आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतीच कामे नाहीत. मागील सरकारच्या काळातील योजनांना स्थगिती द्या, नाही तर अग्रलेखातून टिकाटिपणी करा, यापलीकडे हे महाआघाडीच सरकारचं कामच नसल्याची घणाघाती टिका देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ही आहेत ठळक मुद्दे
- सत्तांतराकडे आम्ही डोळे लावून बसलो नाहीत. विरोधी पक्षाच्या भूमिकेतून सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम सक्षमपणे करत आहोत.
- अनैसर्गिक संघ तुटेल त्यावेळी सक्षम सरकारचा पर्याय नक्कीच जनतेसमोर असेल.
- काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदेना हे सरकार विसरते, मग जनतेचे आश्वासन कसे लक्षात ठेवणार?
- जे वीज सर्वसामान्यांनी वापरलेच नाही त्याचे बिल नागरिकांनी, व्यापार्यांनी का भरावे?









