मद्र देशाच्या राजाची लक्ष्मणा नावाची एक कन्या होती. ती अत्यंत रूपवान होती व गौरी किंवा सावित्रीप्रमाणे सुलक्षणी होती. आपल्या कन्येचे गुण जाणून राजाला वाटत होते की भगवान विष्णू आपले जावई व्हावेत. सर्वांमध्ये जो वरि÷ आहे, बळ, प्रताप, गुणांनी श्रे÷ आहे असा वैकुंठनायक आपल्या कन्येला पती म्हणून लाभावा असे त्याला वाटे. त्याकरिता वरपरीक्षा करण्याकरिता त्याने चतुराईने एका विलक्षण प्रतिज्ञा यंत्राची निर्मिती केली. पांचाळीच्या स्वयंवरात जसे यंत्र निर्माण केले होते व ते भेदून अर्जुनाने पण जिंकला होता, तसेच काहीसे हे होते. एका स्तंभावर भास पक्षी टांगला होता. स्तंभाच्या खाली एक कलश ठेवला होता. त्या कलशात पाहून जो भास पक्षाचा अचूक वेध आपल्या बाणाने घेईल त्याला आपली कन्या लक्ष्मणा अर्पण केली जाईल असे राजाने जाहीर केले. हे ऐकून देश विदेशातील अनेक राजे तेथे आले. खुद्द अर्जुनही आला. त्या सर्वांनी प्रयत्न केले. पण एकालाही तो पण पूर्ण करता आला नाही. त्यानंतर स्वतः कृष्ण तेथे आला आणि त्याने लीलया तो पण पूर्ण केला आणि लक्ष्मणा जिंकली. लक्ष्मणाला अत्यंत आनंद झाला. कृष्णाने तिला उचलून आपल्या रथात बसवली.
एकला देखोनि श्रीभगवान । भूभुज करिती समराङ्गण । त्यांचा भंगूनियां अभिमान । नोवरी जिंकूनि जय वरिला । जेंवि सुपर्णें जिंकूनि विबुधां । स्वर्गींहूनि आणिली सुधा । तेंवि श्रीकृष्णें भूपाळवृंदा। भंगूनि प्रमदा पर्णियली । लोकत्रयीं दाविली ख्याति। भंगले भूप स्वपुरा जाती । यथविधानें मद्रनृपति । कन्या श्रीपती मग अर्पी । विजयश्रियेसिं वाद्यगजरिं। कृष्ण प्रवेशे द्वारकापुरिं । मद्रपतिही स्वसैन्यभारिं । बोळवी श्रीहरि सप्रेमें ।
कृष्ण एकटा आलेला पाहून अनेक वीरांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. पण पराक्रमी कृष्णाने त्यांचा सहज पराभव केला. मग मद्राधिपतीने विधीपूर्वक आपली कन्या कृष्णाला अर्पण केली. तिला घेऊन कृष्ण द्वारकेत परतला.
अष्टमहिषी वेगळय़ा तिया । विविधा परीच्या अन्यत्र भार्या । कृष्णासि असत्या जाल्या राया। षोडशसहस्रशतोत्तरा।कोठें होत्या तिया म्हणसी । पृथग्विवाह त्यांचे पुससी ।
तरी तूं ऐकें इएयेविषीं। गोष्टी अल्पसी तुज कथितों।भौमासुराच्या अंतःपुरिं । निरुद्ध होत्या बहु कुमारी । भौमासुरातें मारूनि हरि । द्वारकेमाझारी आणिल्या त्या । विध्यंक्त करूनि पाणिग्रहणा । वरिता जाला त्रैलोक्मयराणा । सुभगा साध्वी चारुदर्शना । कृष्णांगना त्या सुरवंद्या ।
ऐसी ऐकूनि श्रीशुकवाणी। अभिमन्यंतनय चातुर्यखाणी । प्रश्नालागूनि वक्ष्यमाणीं । अंतःकरणीं सोत्कंठ । कैसा मारिला भौमासुर । कैशा वरिल्या वधू समग्र । भौमें कन्यकासंग्रह फार । केला सादर कोठूनी ।
आतापर्यंत वर्णन केलेल्या रुक्मिणी, जाम्बवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, नाग्नजिती, भद्रा व लक्ष्मणा या आठ कृष्णाच्या मुख्य पत्न्या होत. याखेरीज कृष्णाच्या अशा आणखीही हजारो स्त्रिया होत्या. भौमासुराला मारून त्याच्या बंदिगृहातून त्याने त्या सुंदरींना सोडवून आणले होते.
Ad. देवदत्त परुळेकर








