18 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीची सांगता, तिन्ही क्रिकेट प्रकारातून 12780 धावा, 392 बळींचे योगदान
लाहोर / वृत्तसंस्था
पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू मोहम्मद हाफीझने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. पाकिस्तानचे सर्व क्रिकेट प्रकारात नेतृत्व सांभाळलेल्या हाफीझने मागील दोन दशकात आपण अपेक्षेपेक्षाही अधिक कामगिरी साध्य केली असल्याचे निवृत्तीप्रसंगी नमूद केले. 41 वर्षीय हाफीझने यापूर्वी 2018 मध्ये कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. त्याने पाकिस्तानतर्फे 392 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधीत्व करत त्यात 12780 धावा जमवल्या. शिवाय, 392 बळीही घेतले.
‘आज मी अभिमानाने आणि समाधानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत आहे. आजवरच्या वाटचालीतील सर्व सहकारी, कर्णधार, सहायक पथकातील सदस्य व पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा मी आभारी आहे’, असे हाफीझने पीसीबीतर्फे जारी पत्रकात नमूद केले.
हाफीझने 55 कसोटी, 218 वनडे व 119 टी-20 सामने खेळले. यात 3 वनडे विश्वचषक व 6 टी-20 विश्वचषक स्पर्धांचा समावेश आहे. हाफीझने 2003 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध वनडे लढतीत आंतरराष्ट्रीय पदार्पण नोंदवले. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला, तो हाफीझसाठी शेवटचा सामना ठरला. आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत तो 32 वेळा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पाकिस्तानतर्फे सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱया खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या स्थानी राहिला. या यादीत शाहिद आफ्रिदी (43), वासिम अक्रम (39) व इंझमाम-उल-हक (33) पहिल्या तीन स्थानी विराजमान आहेत. हाफीझने याशिवाय 9 वेळा मालिकावीर पुरस्कार संपादन केले असून या निकषावर तो इम्रान खान, इंझमाम व वकार युनूस यांच्यासह संयुक्त बरोबरीत आहे.









