प्रा. रमेश आढाव / फलटण :
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गुणवरे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच, ईश्वरकृपा शिक्षण संस्थेच्या विद्यमान सचिव साधना संभाजीराव गावडे यांनी अल्पावधीत फलटण पूर्व भागाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात दमदार एंट्री करून आपल्या अष्टपैलू कर्तृत्वाची कर्तृत्ववान मोहर उमटवली आहे. गोरगरिब व सर्वसामान्यांसाठी अविश्रत परिश्रम घेऊन इंग्रजी शिक्षणाचे दालन खुले करणाऱ्या साधनाताई या भागाला सुपरिचीत आहेत. शिवाय फलटण पूर्व भागातील एक सुशिक्षीत, सुसंस्कारी, धाडसी, संयमी, शांत व सर्वांना बरोबर घेवून विविध क्षेत्रात प्रामाणिक व मनापासुन काम करणाऱया भगिनी अशी त्यांची ओळख आहे.
इंग्रजी भाषेचे महत्व ओळखून साधनाताईंनी 2013 मध्ये गुणवरे सारख्या ग्रामीण भागात ईश्वरकृपा नावाची शिक्षण संस्था स्थापन केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाचे धडे देण्याच्या कामाचा शुभारंभ सन 2014 साली प्रत्यक्ष ब्लुम इंग्लिश मिडीयम स्कूलच्या माध्यमातून केला. गत 7-8 वर्षांमध्ये या शैक्षणिक संकुलाने प्रगतीच्या दिशेने गरूडझेप घेतली आहे. सुसज्ज अशी देखणी शालेय इमारत, मोठे क्रिडांगण, शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना लाजवेल अशा शैक्षणिक सोयीसुविधा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्गाची टिम, स्वच्छ शालेय परिसर, प्रशस्त पार्किंग यासह अनेक वैशिष्टय़ांनी नटलेली शाळा मोठय़ा दिमाखात उभी आहे. ग्रामीण विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षण देणारी प्रभावी यंत्रणा त्यांनी उभारली आहे. केवळ शिक्षण नव्हे तर गुणवत्ता आणि दर्जा याकडे लक्ष दिले जात आहे. शिक्षणाबरोबरच सामाजिक उपक्रमालाही या संस्थेने प्राधान्य दिले असल्याची ढिगभर उदाहरणे सांगता येतील.
संस्थेचे अध्यक्ष ईश्वर आप्पाजी गावडे, सचिव स्वतः साधनाताई आणि त्यांचे पती आर. टी. ओ. संभाजीराव गावडे या तिघांच्या अथक प्रयत्नातून इंग्रजी माध्यमाची उभी राहिलेली शाळा म्हणजे गुणवरे गावात उभारलेले एक ज्ञानमंदिर आहे. या मंदिरात गाव व परिसरातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेवून शिक्षणप्रक्रिया पूर्ण करून गावाची शान वाढविली आहे. शिक्षण संस्थापकांनी बदलणाऱया काळाची आव्हाने स्वीकारून आधुनिकतेच्या दिशेने पाऊल पुढे टाकले आहे. या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील सुमारे 25 गावातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचा लाभ मिळत आहे. विद्यार्थ्याची, शिक्षक वर्गाची, अद्यापन सुविधांची कोणतीही गैरसोय होणार नसल्याची काळजी घेताना साधनाताई दिसतात. पालक सभा, ऐतिहासिक स्थळांना भेटी, वार्षिक सहली, स्पर्धा परिक्षा, स्कॉलरशीप परिक्षा सराव असे विधार्थ्यांना उपयुक्त शाळा व संस्था राबवित असते. ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञानाची माहिती व्हावी यासाठी संस्थेने ज्युनिअर विभाग सुरू करून विज्ञान शाखा प्रत्यक्ष सुरू केली आहे. यामुळे ब्लूम स्कूलच्या व्याप्तीचा आलेख वाढताना दिसतो आहे. मुलांचा व्यक्तीमत्व विकास झाला पाहिजे यासाठी विविध शालेय खेळ प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्याना शिकवले जातात. क्रीडांगणाचा पुरेपूर वापर खेळाडू विद्यार्थ्यांना झाला पाहिजे यासाठी क्रिडा शिक्षक मेहनत व परिश्रम घेत असतात.
मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर येतो. यासाठी संस्थापकासह शिक्षक वर्गही विद्यार्थ्यांची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेत असतात. अबॅकस, सीसीटिव्ही, विविध खेळणी, कॉम्प्युटर लॅब यासह अन्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. निसर्गरम्य वातावरणात अध्यापन करणारे विधार्थी भविष्यात भारत देशाचा जबाबदार नागरिक म्हणून वावरेल यात शंका नसल्याची ग्वाही साधनाताई देताना दिसतात.

ऑगस्ट 2015 ते जून 2017 या कालावधीमध्ये साधनाताई यांना गुणवरे गावच्या सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. सरपंचपदाची जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव म्हणून त्यांनी गावाच्या विकासाची अनेक कामे केली. पायाभुत सुविधांचा विकास याबरोबरच विविध जाती, धर्म, यांच्यात सामाजिक सलोखा राखत गावात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्या सतत प्रयत्नशील राहिल्या. गरिबांच्या सुख दुःखात सहभागी होणे, त्यांना सहकार्य करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. सरपंच ग्रामसुरक्षा दल या माध्यमातून गाव व परिसरात उल्लेखनीय काम करत दारुबंदी, दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांचा (रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य) विकास यासह अनाथ मुलींना दत्तक घेवून त्यांच्या शिक्षणाचा खर्च सरपंच पदाच्या मानधनातून केला आहे.
साधनाताई यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रिडा, साहित्य, सांस्कृतिक, क्षेत्रातील त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल विविध पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये सुधीर फाउंडेशन (कटगुण) चा सावित्रीबाई फुले पुरस्कार, साहस पुरस्कार (सातारा), महाराष्ट्र जर्नालिस्टचा फाउंडेशनचा ‘द प्राईड ऑफ इंडिया भास्कर, सकाळचा मधुरांगण, अरिहंत टीव्हीएसचा शौर्य व वर्गिनी आदी पुरस्कारांचा समावेश आहे. ग्रामीण गृहिणी ते इंग्रजी माध्यम शिक्षण संस्थेच्या सचिव या पर्यंतच्या प्रवासात साधनाताईंनी वाचन, मनन, चितंन, व्यासंग, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी याला बगल दिली नाही.









