आयपीएलभोवती कोरोनाचा कहर – वानखेडे स्टेडियमवरील 16 सदस्यही बाधित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्ली कॅपिटल्स संघाचा सदस्य व भारतीय अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला कोरोनाची बाधा झाली असून त्याला आयसोलेट केले गेले आहे, अशी माहिती आयपीएल प्रँचायझीने दिली आहे. या आयपीएल स्पर्धेपूर्वी कोरोनाबाधित असा तो दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी नितीश राणाला देखील कोरोनाची बाधा झाली होती. याशिवाय, वानखेडे स्टेडियमवरील 16 सदस्यांना कोरोनाची लागण झाली असून यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.
‘दिल्ली कॅपिटल्स अष्टपैलू अक्षर पटेल कोरोनाबाधित असल्याचे शनिवारी अहवालातून स्पष्ट झाले. तो दि. 28 मार्च रोजी कोरोना निगेटिव्ह अहवालासह मुंबईतील हॉटेलमध्ये दाखल झाला होता. नंतर त्याचा दुसरा कोव्हिड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे’, असे दिल्ली कॅपिटल्स प्रँचायझीने नमूद केले. अक्षर पटेलने अलीकडेच संपन्न झालेल्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत 3 सामन्यात 27 बळी घेतले होते.
वानखेडे ग्राऊंड स्टाफला बाधा
वानखेडे स्टेडियममधील 10 ग्राऊंड स्टाफ व 6 इव्हेंट मॅनेजर्स अशा 16 सदस्यांना कोरोनाची बाधा झाली असून यामुळे आयोजकांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत चालला असून अशीच परिस्थिती कायम राहिल्यास येथील सामने इंदोर किंवा हैदराबादमध्ये हलवण्याची तयारी सुरु आहे. तूर्तास बीसीसीआय मात्र नियोजित सामने नियोजित ठिकाणीच भरवण्याबद्दल आग्रही आहे. यंदा आयपीएलमधील 10 सामने मुंबईत होणे अपेक्षित आहे.
शुक्रवारी महाराष्ट्रात 47 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले असून तेथील परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स हे संघ मुंबईत आहेत. मात्र, त्यांना वानखेडे स्टेडियमवर प्रवेश नाही. दिल्ली व पंजाबचे संघ ब्रेबॉर्न स्टेडियम व बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील मैदानावर सराव करत आहेत तर केकेआरचा संघ नवी मुंबईत डीवाय पाटील स्टेडियमवर सराव करत आहे.









