जो रुट, जेमिसन, करुणारत्नेलाही नामांकन 24 जानेवारीला विजेत्याची घोषणा
वृत्तसंस्था/ दुबई
वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू पुरस्कारासाठी भारताचा अव्वल ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनसह चार जणांचे नामांकन जाहीर झाले आहे. 35 वर्षीय अश्विनने 8 कसोटी सामन्यात 16.23 च्या सरासरीने 52 बळी घेतले. शिवाय, फलंदाजीत 28.08 च्या सरासरीने 337 धावांचे योगदानही दिले. अश्विनशिवाय, इंग्लिश कर्णधार जो रुट, न्यूझीलंडचा जलद गोलंदाज काईल जेमिसन व श्रीलंकन सलामीवीर दिमुथ करुणारत्ने यांनाही या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे. दि. 24 जानेवारी रोजी पुरस्कार जेत्याची घोषणा केली जाईल.
अश्विनने यंदा वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत 128 चेंडूत 29 धावांची संयमी खेळी साकारत आपल्या जिद्दीचा प्रत्यय आणून दिला. त्याने हनुमा विहारीसह साकारलेल्या संघर्षमय भागीदारीमुळे भारताला ती लढत अनिर्णीत राखता आली आणि यामुळे मालिकाही 1-1 अशा फरकाने बरोबरीत राहिली.
इंग्लंडविरुद्ध मायभूमीत झालेल्या मालिकेतील 4 सामन्यात 14.72 च्या सरासरीने 32 बळी घेतल्यानंतर अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. याशिवाय, त्याने फलंदाजीतही 189 धावांचे योगदान दिले. पुढे, साऊदम्प्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये जलद गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर त्याने 4 बळी घेत फिरकीचा करिष्मा दाखवला होता. इंग्लंडविरुद्ध मालिकेतील चारही सामन्यात राखीव खेळाडूत बसावे लागलेल्या अश्विनने पुढे न्यूझीलंडविरुद्ध 2 सामन्यात 11.36 च्या सरासरीने 14 बळी टिपत मालिकावीर पुरस्कार संपादन केला.
यंदाच्या आयसीसी पुरस्कारात 13 जणांना गौरवले जाणार असून वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू (सर गारफिल्ड सोबर्स चषक), वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (रॅशेल फ्लिन्ट चषक), वर्षातील सर्वोत्तम महिला व पुरुष वनडे क्रिकेटपटू, वर्षातील सर्वोत्तम महिला व पुरुष टी-20 क्रिकेटपटू, सर्वोत्तम उदयोन्मुख पुरुष व महिला क्रिकेटपटू, वर्षातील सर्वोत्तम असोसिएट महिला व पुरुष खेळाडू, खिलाडुवृत्ती पुरस्कार व वर्षातील सर्वोत्तम पंच आदी वैयक्तिक गटातील पुरस्कारांचा यात समावेश आहे.









