रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध ऍरॉन फिंचला मंकडिग पद्धतीने बाद करण्याऐवजी रविचंद्रन अश्विनने ताकीद देऊन त्याची मुक्तता केली व त्यानंतर आपल्या ट्वीटर हँडलवर ही पहिली आणि शेवटची ताकीद असल्याचे आवर्जून नमूद केले. गोलंदाजाने चेंडू हातातून सोडण्यापूर्वी नॉन स्ट्रायकर एण्डवरील फलंदाज क्रीझ सोडत असेल तर त्याला गोलंदाजाने बाद करण्याच्या पद्धतीला मंकडिग पद्धत म्हणून ओळखले जाते. नियमबुकात त्याला स्थानही आहे. मात्र, अशा पद्धतीने बाद करणे खिलाडूवृत्तीच्या विरोधात आहे, असे मानणारा एक गट असून याबाबत अश्विन व त्याच्या संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यात एकवाक्यता नाही.
पाँटिंगने आपण अश्विनला अशा पद्धतीने फलंदाजाला बाद करण्याची मोकळीक देणार नाही, असे म्हटले होते. अश्विनने त्यावेळी वाद होऊ दिला नाही. पण, आता वेळ आल्यानंतर त्याने फिंचला ताकीद दिली आणि ही ताकीद थेट ट्वीटरच्या माध्यमानेही फिरवली आहे.
‘मी एक बाब स्पष्ट करु इच्छितो. 2020 हंगामातील ही पहिली आणि शेवटची ताकीद आहे. नंतर मला याबाबत दुषणे देऊ नका’, असे ट्वीट अश्विनने सदर घटनेनंतर केले. अश्विन गोलंदाजी करत असताना नॉन स्ट्रायकर एण्डवरील फिंच चेंडू हातातून सोडला जाण्यापूर्वीच क्रीझ सोडून बाहेर आला होता. त्यानंतर अश्विनने बेल्स उदध्वस्त न करता फिंचला फक्त इशारा दिला होता. या पद्धतीने फलंदाजाला बाद करण्याच्या विरोधात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या चेहऱयावर देखील यावेळी हसू उमटले. यंदाची आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाँटिंगने अश्विनला आपण मंकडिग करु देणार नाही, अशा आशयाची टिपणी केली होती.
मागील हंगामात आयपीएल स्पर्धेतच अश्विनने जोस बटलरला मंकडिग पद्धतीने धावचीत केले, त्यावेळी मोठा वाद रंगला होता. काही माजी क्रिकेटपटूंनी नियमबुकात याचा उल्लेख असल्याने त्यात काहीही गैर नसल्याचा दावा केला तर काही खेळाडूंनी अशा पद्धतीने फलंदाजाला बाद करणे खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचे नमूद केले होते.









