चेन्नई / वृत्तसंस्था
मद्रास उच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावाई होत असतानाच एक वकील नको त्या अवस्थेत अश्लील कृत्य करताना आढळून आल्याने त्याला वकीली करण्यापासून निलंबित करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी घडली. आर. डी. संथाना कृष्णन असे वकीलाचे नाव आहे.
या प्रकारानंतर पोर्टफोलिओ न्यायाधीश पी. एन. प्रकाश आणि न्या. आर. हेमलता यांनी या वकीलाविरोधात अवमानना कारवाई सुरु केली आहे. त्यांनी पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेशही दिला. चौकशीचा आदेशही देण्यात आला. तामिळनाडू वकील संघटनेलाही या वकीलाविरोधात कठोर कारवाई करुन अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
प्रकरण काय आहे…
सोमवारी उच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्सरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी होत असताना, हा वकील एका महिलेबरोबर नको त्या अवस्थेत आढळून आला. हा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या न्यायाधीशांनी त्वरित कारवाई करण्याचा आदेश दिला व या वकीलाने व्यवसाय करण्यावर बंदी घातली. अशी निर्लज्ज कृत्ये आम्ही स्वस्थपणे पाहू शकत नाही, अशी टिप्पणी न्यायाधीशांनी केली. सार्वजनिक स्थानी जेव्हा अशा हीन घटना घडतात तेव्हा कठोर कारवाई केल्याशिवाय गत्यंतर नसते. त्यामुळे या वकीलाला कोणत्याही न्यायालयात वकीली करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर अहवाल पाहून पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष सुनावणी करण्याची मागणी उच्च न्यायालयाने आता ऑनलाईन सुनावणी बंद करुन ऑफलाईन, अर्थात, प्रत्यक्ष सुनावणी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी मद्रास उच्च न्यायालयाकडे वकील संघटनेने केली आहे. आता न्यायालयात वकील लोक मोठय़ा संख्येने उपस्थित रहात आहेत. त्यामुळे ऑन लाईन सुनावणीची आवश्यकता उरलेली नाही. परिणामी प्रत्यक्ष सुनावणी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.








