क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
शासनाने एक आदेशाद्वारे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कोषाध्यक्षपदी मडगावचे उद्योजक अश्रफ पंडियाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 21 मे रोजी गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांनी एका आदेशाद्वारे त्यांची नियुक्ती जाहीर केली. आता 11 मेपासून अश्रफ पंडियाल हे सागचे कोषाध्यक्ष असतील.
कोरोना विषाणू महामारीने गोवा क्रीडा प्राधिकरणाची आमसभा होऊ शकली नव्हती. खजिनदारपद हे गोवा क्रीडा प्राधिकरणात एक महत्वाचे पद आहे. विविध आर्थिक बाबीसाठी त्यांची स्वाक्षरी महत्वाची असते. अश्रफ हे क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांचे खंदे समर्थक असून त्यांच्या निवडीचा ठराव सर्व सभासदांना पाठवून त्यास मंजूरीही घेण्यात आली आहे. पंडियाल यांची सागच्या खजिनदारपदी दुसऱयांदा निवड झाली आहे.
क्रीडामंत्री बाबू आजगावकर हे गोवा क्रीडा प्राधिकरणाचे उपाध्यक्ष असून पंडियाल यांच्या निवडीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि क्रीडा सचिव यांनीही मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री सावंत हे गोवा क्रीडा प्राधिकरणाचे अध्यक्ष असून, आमदार ग्लेन टिकलो, आमदार जोशूआ वाझ हे सभासद आहेत. याशिवाय अर्थ, क्रीडा व युवा व्यवहार, सागचे कार्यकारी संचालक, गोवा शिक्षण मंडळ, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे जेष्ठ अधिकारी किंवा कोच, गोवा ऑलिंपीक संघटनेचे अध्यक्ष किंवा सचिव यांचीही आमसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय रामा सावळ देसाई, कमलाकर देसाई, संतोष मळीक, प्रशांत देसाई, जॉयल फर्नांडिस, समीर मांद्रेकर, अमेय नाईक, निशा मडगावकर, माजी फुटबॉलपटू लेक्टर मास्कारेन्हस यांनाही सागच्या आमभेवर प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. तसेच राज्यातील 22 क्रीडा संघटनांचे अध्यक्ष किंवा सचिव, उच्च माध्यमिक प्राचार्य मंचचे अध्यक्ष, गोवा हेडमास्टर संघटनेचे अध्यक्ष, जीआयडीसी आणि सागचे सचिव यांनाही सागच्या आमसभेसाठी स्थान देण्यात आले आहे.









