मधल्या वेळेची भूक भागवण्यासाठी तळकट तसंच आरोग्याला हानिकारक पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही आरोग्यदायी पदार्थांची निवड करू शकता. या पदार्थांमुळे तुमची भूक तर भागेलच शिवाय वजनही नियंत्रणात राहील. अशाच काही पर्यायांविषयी…
* मखाणे हा अत्यंत आरोग्यदायी असा पर्याय आहे. मखाण्यांमध्ये कॅलरी कमी आणि सोडियमचं प्रमाण अधिक असतं. तसंच्या याचा जीआय म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्सही कमी आहे. भाजलेले मखाणे खूप मस्त लागतात. मखाणे भाजण्यासाठी तेलही लागत नाही.
मायक्रोवेव्हमध्येही मखाणे भाजता येतील.
* संध्याकाळी चणे खाता येतील. चण्यांमध्ये कर्बोदकं कमी आणि प्रथिनांची संख्या अधिक असते. चण्यांमध्ये फायबरही असतं. प्रथिनं आणि फायबरमुळे वजन कमी व्हायला मदत होते. तुम्हाला सारखी भूक लागत असेल किंवा सतत काहीतरी तोंडात टाकायची सवय असेल तर चणे सोबत ठेवा.
* संध्याकाळी किंवा रात्रीचं जेवण म्हणूनही दलिया खाता येईल. यात फायबर अधिक प्रमाणात असतं. तसंच दलिया पचायलाही हलका असतो. दलिया शिजवताना त्यात गाजर, मटार, फ्लॉवर, ब्रोकोलीसारख्या भाज्या घालता येतील. यामुळे दलिया अधिकच पौष्टिक बनेल.
* शेंगदाणे हाही खूप चांगला पर्याय आहे. यात पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर, लोह आणि सेलेनियम असे पोषक घटक असतात. दाणे भाजून किंवा उकडूनही खाता येतील.
* तुमच्याकडे फळांचाही पर्याय आहे. सफरचंद, पेअर, पपई अशी फळं तुम्ही खाऊ शकता. तसंच वेगवेगळ्या फळांचा वापर करून फ्रूट चाटही तयार करता येईल.









