शोएब अख्तरच्या प्रस्तावाला कपिल देव यांचे सडेतोड प्रत्युत्तर, धोका पत्करून पैसे जमवणे अयोग्य असल्याचे मत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे माजी महान क्रिकेटपटू कपिल देव यांनी पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला सडेतोड प्रत्युत्तर दिले असून भारताला अशा पैशांची काहीही गरज नसून क्रिकेट सामन्यांसाठी जीव धोक्यात घालण्याची काही आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढय़ासाठी पैसा उभा करण्याकरिता भारत व पाकिस्तान यांच्यात फक्त टीव्हीवर दाखविण्यासाठी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जावी, असा प्रस्ताव शोएब अख्तरने मांडला होता. भारत व पाकिस्तानमधील कोरोनाविरुद्धच्या लढय़ासाठी निधी जमविण्याचा हा प्रस्ताव शोएबने बुधवारी वृत्तसंस्थेशी बोलताना मांडला होता. हा प्रस्ताव व्यवहार्य नसल्याचे मत कपिलनी मांडले.
‘शोएबला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण भारताला असा निधी उभारण्याची काही गरज नाही. कारण आपल्याकडे पुरेसा पैसा आहे. आपले अधिकारी या भयानक संकटाशी एकत्रितपणे कशाप्रकारे मुकाबला करतात, ते सध्या आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. यातही राजकारण केले जात असून अनेक राजकारणी एकमेकांना दोष देत असल्याचे दिसून आले आहे. हा घाणेरडा प्रकार थांबायलाच हवा,’ असे कपिल म्हणाले.
‘या संकटाशी मुकाबला करण्यासाठी देशभरातून मदतीचा ओघ येत असून बीसीसीआयने 51 कोटी रुपयांची भरीव मदत केली आहे आणि भविष्यात गरज पडल्यास आणखी मदत करण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे शोएब म्हणतो तशा पद्धतीने निधी जमा करण्याची आम्हाला काहीही गरज नाही,’ असे कपिलनी ठणकावून सांगितले. ‘सध्या जी स्थिती निर्माण झाली आहे, त्यात लवकर सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. क्रिकेटपटूंचे जीव धोक्यात घालून अशा परिस्थितीत सामन्यांचे आयोजन करणे शहाणपणाचे ठरणार नाही आणि त्याची आवश्यकताही नाही,’ असे विश्वचषक विजेते कर्णधार पुढे म्हणाले.
पुढील किमान सहा महिने तरी क्रिकेटचा विचार केला जाऊ नये, असे त्यांना वाटते. ‘असा धोका पत्करणे सध्या योग्य ठरणार नाही. याशिवाय तीन सामन्यांतून असा कितीसा निधी जमा होणार आहे? पुढील पाच-सहा महिने तरी क्रिकेटचा विचारही केला जाऊ नये, असे माझे मत आहे’, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला. ‘देशापेक्षा खेळ मोठा नाही. त्यामुळे संकटाचे पूर्णपणे निवारण झाल्यानंतर क्रिकेटला पुन्हा सुरुवात होऊ शकते. सध्याचा प्रमुख मुद्दा आहे तो गरिबांच्या रक्षणाचा, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस आणि या कोरोनाविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असणाऱया अन्य घटक यांचा. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे,’ असे ते म्हणाले. अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांसह अन्य देशांना मदत करण्याची भारताची क्षमता पाहिल्यानंतर एक भारतीय म्हणून अभिमान वाटत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. हायड्रॉक्सी-क्लोरोक्विन या मलेरियासाठी वापरल्या जाणाऱया औषधाचा भारताने अमेरिकेला मुबलक पुरवठा केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांवर या औषधाचा प्रभावी वापर होत असून भारत या औषधाचा प्रमुख निर्माता आहे.
‘इतरांना मदत करणे ही आपली संस्कृती आहे आणि याचा मला अभिमान आहे. मात्र मदत केल्याचे श्रेय कधी घेऊ नये. इतरांकडून घेण्यापेक्षा इतरांना अधिकाधिक साहय़ करणारा देश बनविण्याचा आपण प्रयत्न करायला हवा, असेही कपिल म्हणाले. कपिल सध्या घरीच असून सोशल डिस्टन्सिंगही अमलात आणत आहेत.









