हशमत गनी यांचा दावा – अध्यक्षांच्या देश सोडण्याचे सांगितले कारण
अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला आहे, पण त्यांचे बंधू हशमत अद्याप काबूलमध्ये आहेत. प्रभावशाली अफगाणी नेते आणि उद्योजक हशमत यांनी तालिबानी राजवट मान्य केली असली तरीही तालिबानमध्ये सामील झालो नसल्याचे म्हटले आहे. अरशफ 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानातून बाहेर पडून युएईमध्ये पोहोचले होते.
रक्तपात टाळण्यासाठी तालिबानची राजवट मान्य केली आहे. सुशिक्षित आणि उद्योग-व्यवसाय करणाऱया अफगाणच्या नागरिकांसाठी काबूलमध्ये थांबलो आहे. तालिबानमध्ये सामील होणार नाही. देशात राहून तालिबान आणि लोकांदरम्यान सेतू होण्याचा प्रयत्न असेल. देशात उपासमारीचे संकट निर्माण होऊ नये असा प्रयत्न असल्याचे हशमत म्हणाले.
भारत अद्याप अफगाणिस्तानात पाकिस्तानची भूमिका वाढल्याचे पाहत आहे. भारताने समंजसपणा दाखवून योग्य निर्णय घेतला आहे. भारत, इराण, मध्य आशिया, रशिया यासारख्या देशांसोबत आंतरराष्ट्रीय आणि व्यापारी संबंध अफगाणी समुदाय आणि व्यापारासाठी आवश्यक असल्याचे तालिबानला स्पष्टपणे सांगितले आहे. विशेषकरून सध्याच्या ऋतूमध्ये अफगाणमधील ड्रायप्रूट्सच्या व्यापारासाठी हे संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत असे हशमत म्हणाले. अशरफ गनी यांच्या विरोधात कट रचण्यात आला होता. काही लोक त्यांची हत्या घडवून आणत रक्तपात इच्छित होते. गनी यांनी देश सोडून काबूलला रक्तपातापासून वाचविले आहे. भारत आणि अफगाणींच्या संबंधांवर तालिबानी राजवटीचा फरक पडणार नाही. भारत, पाकिस्तान आणि मध्य आशियादरम्यान सुरळीत राजनयिक संबंध आम्ही नक्की पाहू असे हशमत यांनी म्हटले आहे.









