तालिबानची मोठी खेळी – अफगाणिस्तानात परतण्याची दिली मुभा
अफगाणिस्तानात लोकांच्या विरोधाचा सामना करत असलेल्या तालिबानच्या दहशतवाद्यांनी माजी अध्यक्ष अशरफ गनी आणि उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांना ‘सार्वत्रिक माफी’ देण्याची घोषणा केली आहे. हे दोन्ही नेते काबूलमध्ये परतू शकतात असेही म्हटले आहे. अशरफ गनी सध्या दुबईत निर्वासित म्हणून राहत आहेत. तर सालेह यांनी अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱयाला स्वतःच्या प्रतिकाराचे केंद्र केले आहे. पंजशीर खोऱयातून तालिबानला लक्ष्य केले जात आहे.
तालिबानचे अशरफ गनी, सालेह आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांच्याशी कुठलेच शत्रुत्व नाही. आम्ही गनी, सालेह आणि मोहिब यांना माफ केले आहे. या तिघांसोबत आमचे शत्रुत्व केवळ धार्मिक आधारावरच होते असे उद्गार तालिबानी नेता खलिल उर रहमान हक्कानी याने काढले आहेत. हक्कानीला अमेरिकेने जागितक दहशतवादी घोषित केले असून त्याच्या विरोधात 50 लाख डॉलर्सचे इनाम आहे.
सर्व अफगाण आमचे बंधू
आमच्याकडून सर्वांना माफ करण्यात आले आहे. आमच्याविरोधात युद्ध लढलेले नागरिक असो किंवा सर्वसामान्य नागरिक सर्वांना माफ करण्यात आले आहे. लोकांनी देश सोडून जाऊ नये. तालिबान सूड उगवेल अशा दुष्प्रचार आमचे शत्रू करत आहेत. ताजिक, बलूच, हजारा आणि पश्तून हे सर्व आमचे बंधू आहेत असेही त्याने म्हटले आहे.
मोठय़ा विजयाचा दावा
आमच्या शत्रुत्वाचे एकमेव कारण व्यवस्था बदलण्यावरून होती. ही व्यवस्था आता बदलली आहे. तालिबानने अमेरिकेच्या विरोधात युद्ध लढलेले नाही. अमेरिकेने आमच्यावर हल्ले केले आणि आम्ही आमची संस्कृती, धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी ही लढाई लढलो आहोत. अमेरिका आमच्या देशाच्या विरोधात शस्त्रास्त्रांचा वापर करत आहे. तालिबानने स्वतःच्या शत्रूंच्या विरोधात मोठा विजय मिळविला असल्याचा दावा हक्कानीने केला आहे.
कथित हृदय परिवर्तन
अमेरिकेकडून समर्थन प्राप्त असलेल्या अफगाण सैन्यावर आम्ही मात केली आहे. सर्व मुस्लीम देश परस्परांशी जोडले जावेत अशी तालिबानची इच्छा आहे. स्वतःच्या देशाच्या नागरिकांना मूलभूत अधिकार द्यावेत असा सल्ला हक्कानीने जगभरातील देशांना दिला आहे. अत्यंत सक्षम आणि सुशिक्षित लोक अफगाणिस्तानात सरकार स्थापन करतील. यात सर्व समुहांना सामील केले जाईल असे हक्कानी म्हणाला. देशात वाढत्या विरोधाला शमविण्यासाठी तालिबानचे हे कथित हृदय परिवर्तन झाल्याचे मानले जात आहे.









