प्रतिनिधी / सातारा
शहरालगत खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्रतापसिंहनगर झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टी व परिसरात तब्बल 15 देशी दारुचे अवैध धंदे सुरू आहेत. मटक्याचे आकडे घेणारे तर अनेक ठिकाणी दिसतात. कोरोनाच्या काळात ही यांच्याकडे आकडा लावायला गर्दी हाऊसफुल्ल असते. एवढेच नाही तर येथील अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये स्वस्त दारू विकण्याची स्पर्धा सुरू असून सातारा शहर पोलिसांना ही त्यांनी ओपन चॅलेंज दिले आहे. प्रतापसिंहनगरातली अवैध धंदे बंद करून दाखवाच, एका तर दारू विक्री करणाऱ्याने संगमनगर पोलीस चौकी आणि एमआयडीसी पोलीस चौकीतील कर्मचारी हे दहशतीखाली असल्याने ते काहीच कारवाई करू शकत नाहीत, असे सांगितले.
शहरालगत असलेल्या प्रतापसिंहनगर झोपडपट्टी अलीकडे काहीशी सुधारली आहे. अनेकजण शिकले आहेत. सरकारी नोकरीत लागले आहे. मात्र, अजूनही काही अपप्रवृत्ती या प्रतापसिंहनगरात कार्यरत आहेत. तब्बल पंधरा जणांचे बेकायदेशीर दारुचे व्यवसाय याठिकाणी सुरू आहेत. येथील दारू विक्री करणारे होलसेल एक देशी दारूची बाटली 53 रुपयांना आणून कोणी 60 तर कोणी 70 रुपयास विकत असल्याची माहिती एका दारू विक्रेत्याकडून मिळाली.
कोरोनाच्या काळात प्रतापसिंहनगर परिसरात अवैध व्यवसायाना जोम आला आहे. अगोदरच पोलिस या परिसरात यायला घाबरतात त्यात एकाही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी या परिसरातल्या अवैध व्यवसायिकांकडून मंथली घेत नाही असेच सांगण्यात आले. दरम्यान, मटका बुकींचे चांगलेच ओपन क्लोज सुरु असते. बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली, प्रीती हॉटेलच्या पाठीमागे, लघु पाटबंधारे कार्यलयाच्या पाठीमागे एका टपरीत, कण्हेर कालव्याच्या लगत एका टपरीत, खेड फाट्यावर एका ठिकाणी, प्रतापसिंहनगरात काही ठिकाणी मटका सुरू आहे. कोरोनाची भीती आकडा खेळणाऱ्या आणि दारू गुत्यावर जाणाऱ्यांना नसून पण संगमनगर पोलीस चौकी आणि एमआयडीसी पोलीस चौकीकडून कोणतीही कारवाई होत नाही. तेच कारवाई करायला भितात. त्यांनी अवैध दारुचे व्यवसाय बंद करून दाखवावेत, असे ओपन चॅलेंज अवैध दारू विक्री करणारे देत आहेत.
लक्ष्मी टेकडीवर मटका बोकाळला
लक्ष्मी टेकडी परिसर हा झोपडपट्टीचा सातारा शहरातला भाग आहे. येथेही अवैध धंदे करणाऱ्यावर सदरबाजार पोलीस चौकीचा कसला ही वचक नाही. पोलीस चौकीपासून अगदी दोनशे मीटरच्या अंतरावर एक चौक आहे. त्या चौकात मटका घेतला जातो. लक्ष्मी टेकडीमध्ये पाण्याच्या टाकी खाली मटका घेतला जातो.सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला एका घरात मटका घेतला जातो. तसेच मागच्या महिन्यात अवैध दारूच्या गुत्यावर छापा टाकला होता. तेथेही पुन्हा दारूची विक्री सुरू झाली आहे. काही युवक अवैध व्यवसाय करतात. त्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यानी लक्ष्मी टेकडी परिसरातील अवैध व्यवसाय बंद करावेत अशी मागणी केली आहे.









