हिंडलगा कारागृहात रवानगी : पुन्हा कोठडीत घेण्यासाठी सीआयडीच्या हालचाली
प्रतिनिधी / बेळगाव
बनावट ओळखपत्र दाखवून आपण पोलीस अधिकारी असल्याचे भासवून टोलनाका पार करणाऱया हुबळी येथील किरण वीरनगौडर याची या प्रकरणातही चौकशी होणार आहे. त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यामुळे रविवारी त्याला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले आहे.
न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. संकेश्वर पोलीस स्थानकात 6 जून रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत किरण वीरनगौडर याच्याबरोबरच काही पोलीस अधिकाऱयांवरही एफआयआर दाखल करण्यात आले होते. याच प्रकरणात त्याला अटक करून सीआयडीने त्याला पोलीस कोठडीत घेतले होते.
7 जून रोजी सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक रामचंद्र यांनी किरण वीरनगौडर विरुद्ध हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केले होते. केए 63, एम 2993 या पेटा कारमधून हुबळीहून बेळगावला येताना किरणने अनेक वेळा आपण पोलीस अधिकारी असल्याचे ओळखपत्र दाखवून हिरेबागेवाडी टोलनाका पार केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
रविवारी सीआयडीचे एक पथक हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात ठाण मांडून होते. सोमवारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडीत घेण्यात येणार आहे. दरम्यान, रविवारी विशेष न्यायालयाच्या आदेशावरून किरणला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
तब्बल चौदा दिवस बेळगाव, हुबळी-धारवाड व बेंगळूर येथे त्याची कसून चौकशी करण्यात आली असून काही पोलीस अधिकाऱयांच्याही जबानी सीआयडीने घेतल्या आहेत.
9 जानेवारी 2021 रोजी यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात मंगळूरहून कोल्हापूरकडे जाणारी कार अडविण्यात आली होती. नंतर त्या कारमधील 4 किलो 900 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते. तब्बल चौदा दिवस पोलीस कोठडीत घेऊन त्याची चौकशी करण्यात आली असली तरी अद्याप चोरीचे दागिने सापडलेले नाहीत. हुबळी येथील जेडी नामक सराफाचीही या प्रकरणी चौकशी झाली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे कोणी बंद पाडले?
यमकनमर्डी पोलीस स्थानकासमोर उभ्या करण्यात आलेल्या अर्टिगा कारची काच फोडून सोने चोरण्याचा प्रयत्न झाला. तत्पूर्वी पोलीस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले आहेत. सीआयडीच्या अधिकाऱयांनी यमकनमर्डी पोलीस स्थानकातील पाच पोलिसांची चौकशी केली असून चार दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दोन हवालदारांसह आठ पोलिसांची उचलबांगडी केली आहे. कारमधील सोने चोरण्यात स्थानकातील कोण कोण पोलीस सामील होते, याची चौकशी करण्यात येत आहे. या टोळीने पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक गुन्हे केल्याचे उघडकीस येत असून सीआयडी तपास सुरू आहे.









