प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक उच्च न्यायालयाने एका नव्या आदेशाद्वारे सरकारला अवैधरित्या बांधण्यात आलेली सार्वजनिक मंदिरे आणि प्रार्थनास्थळे हटविण्याचा आदेश दिला आहे. याअंतर्गत बेळगाव जिल्हा प्रशासनाने शहरातील 29 अशा स्थळांची यादी तयार केली आहे व
त्यांच्या चालकांना नोटीस पाठविली आहे.
चालकांनी स्वतःहूनच ही मंदिरे हटवावीत, अन्यथा प्रशासनाला कारवाई करावी लागेल, असेही नोटिसीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात एका याचिकाकर्त्याने दाखल केलेल्या याचिकेची दखल घेऊन राज्य सरकारने हा आदेश दिला आहे. केवळ मंदिरेच नव्हे तर अवैधरित्या बांधण्यात आलेले रस्ते, उद्याने ही सुद्धा हटवावेत, असाही आदेश देण्यात आला आहे.
अश्वत्थामा मंदिराची जागा अधिकृत…
मंगळवारी सोशल मीडियासह काही माध्यमांमध्ये पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिराला हटविण्याचे वृत्त व्हायरल झाले. याबाबत मंदिर समितीशी संपर्क करता हे वृत्त निराधार असल्याचे समितीने सांगितले. 1997 मध्ये तत्कालिन आयुक्त डी. बी. नायक यांच्या कारकीर्दीत उताऱयासह सर्व कागदपत्रे सादर करून मंदिराची जागा अधिकृत असल्याचे पुराव्यासह सिद्ध केले आहे. मंदिराबाबतची सर्व कागदपत्रे सुरक्षित असल्याची माहिती तत्कालिन नगरसेवक रायम वॉझ यांनी ‘तरुण भारत’ला दिली.









