वाळपई / प्रतिनिधी
वाळपई नगरपालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने एक वर्षापूर्वी दिले होते. मात्र सदर बांधकामे पाडण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होती. शेवटी एका इसमाने न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केल्यानंतर वाळपई नगरपालिकेची धावपळ सुरू झाली. अवैध बांधकामे हटविण्याची प्रक्रिया त्वरित मंगळवारपासून हाती घेण्यात आली. तीन बांधकामांपैकी एक बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले आहे. तर अन्य दोन बांधकामावर 27 जानेवारी व 31 जानेवारी रोजी कारवाई करण्यात येणार आहेत, अशी माहितीनुसार सूत्रांनी दिली
नगरपालिका क्षेत्रामध्ये विनापरवानगी बांधकामे उभारली आहेत. याच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या संदर्भात निकाल जवळपास एक वर्षापूर्वी झाला होता. एका बांधकाम प्रकरणी शेख दाऊद यांचे अवैध बांधकाम असल्याची तक्रार मुबारक अली खान यांनी पालिकेकडे केली होती. तसेच या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठांमध्ये याचिका दाखल दाखल होती. यावर एक वर्षापूर्वी गोवा खंडपीठाने सदर बांधकाम अवैध असल्याचा निकाल देत ताबडतोब अमंलबजावणी करण्याचे आदेश पालिका संचालनालयाला दिले होते. मात्र सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अवमान न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी झाली. आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे नमूद करून टाळाटाळ केल्यास संबंधित यंत्रणेवर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले होते.
न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेची धावाधाव
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी ताबडतोब करण्यात यावी अन्यथा संबंधित अधिक्रायावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देताच नगरपालिकेचे धावपळ सुरू झाली. मंगळवारी अचानक सुरू झालेल्या कारवाईमुळे सर्वत्रच खळबळ निर्माण झाली. वेळुस येथील बांधकामावर कारवाई करत बांधलेले गाळे व गॅरेज पूर्णपणे जमीनदोस्त केले.
दरम्यान शेख दाऊद यांच्या बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. आता अशाच प्रकारची कारवाई मुबारक अली खान यांच्या बांधकामावर होण्याची शक्यता आहे यासाठी 27 किंवा 31 जानेवारी दरम्यान ही कारवाई होण्याची शक्यता आहे. यासाठी आवश्यक यंत्रणा तयार ठेवण्यात आली असून या दोन दिवसांमध्ये सदर कारवाई हाती घेऊन या संदर्भात अहवाल उच्च न्यायालयाला सादर करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार समजते.









