पॅरालिम्पिक्स सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला, पॅरालिम्पिक इतिहासात भारतासाठी चौथे सुवर्ण
टोकियो / वृत्तसंस्था
नेमबाज अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्ण जिंकत सोमवारी पॅरालिम्पिक्समध्ये नवा इतिहास रचला. पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवणारी ती पहिली भारतीय महिला पॅरा-ऍथलिट ठरली. अवनीने आर-2 महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल स्टँडिंग एसएच-1 इव्हेंटमध्ये अव्वलस्थान काबीज करत हा पराक्रम गाजवला. त्यानंतर सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला विश्वविक्रमासह दिवसातील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.
जयपूरची 19 वर्षीय अवनी हिला 2012 मध्ये कार अपघातात मणक्याची गंभीर दुखापत झाली होती. येथे तिने 249.6 गुणांचा नवा विश्वविक्रम रचत भारताला सुवर्ण मिळवून दिले. हा नवा पॅरालिम्पिक विक्रम देखील आहे.
भारतासाठी पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्ण जिंकणारा तो चौथा ऍथलीट ठरला. यापूर्वी, जलतरणपटू मुरलीकांत पेटकर (1972), भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया (2004 व 2016) व उंच उडीपटू (मरियप्पन थंगवेलू (2016) यांनी पॅरालिम्पिक्समध्ये सुवर्ण जिंकले आहेत.
पुरुष गटात आर-1 10 मीटर्स एअर रायफल स्टँडिंग एसएच 1 इव्हेंटमध्ये महावीर स्वरुप उन्हाळकरला पदकाने किंचीत फरकाने हुलकावणी दिली. तो 203.9 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. राष्ट्रीय सहकारी दीपक पात्रता फेरीत गारद झाला.
महिला गटात लेखराने असाका शूटिंग रेंजवर रंगलेल्या अंतिम लढतीत चीनची 2016 रिओ पॅरालिम्पिक्स सुवर्णजेती क्युईपिंग झँग हिच्यावर मात केली. लेखराने 249.6 तर झँगने 248.9 गुण कमावले. जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित व विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन इरिना स्केतनिक (युक्रेन) कांस्यपदकाची मानकरी ठरली. तिने 227.5 अंक मिळवले. लेखराला यापूर्वी 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. मात्र, यंदा मार्चमध्ये अल एन येथील पॅरा-शुटिंग वर्ल्डकपमध्ये तिने रौप्य जिंकले होते.
यंदा पॅरालिम्पिक्समध्ये प्रथमच सहभागी होत असणारी लेखरा जागतिक मानांकन यादीत पाचव्या स्थानी असून येथे तिने क्वॉलिफिकेशन व फायनल अशा दोन्ही फेऱयांमध्ये सातत्य राखत वर्चस्व अबाधित राखले. क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये सातवे स्थान मिळवत ती फायनलमध्ये पात्र ठरली होती. त्यानंतर फायनलमध्ये ती आणखी सरस, अव्वल कामगिरी साकारण्यात यशस्वी ठरली.
अवनी लेखरा या पॅरालिम्पिक्समध्ये मिश्र 10 मीटर्स एअर रायफल प्रोन, महिला 50 मीटर्स रायफल 3 पोझिशन्स एसएच 1 व मिश्र 50 मीटर्स रायफल प्रोन इव्हेंटमध्ये देखील सहभागी होणार आहे.
बिंद्राचे पुस्तक वाचले आणि तिरंदाजीकडून नेमबाजीकडे वळली अवनी लेखरा!
आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेत खेळाकडे वळलेल्या अवनीने नेमबाजीपूर्वी तिरंदाजीतही स्वतःला आजमावून पाहिले. मात्र, ती नेमबाजीतच अधिक रमायची आणि एकदा 2008 बीजिंग सुवर्णविजेता अभिनव बिंद्राचे एक पुस्तक वाचल्यानंतर ती पूर्णपणे नेमबाजीकडे वळली. तिने जयपूरमध्ये 2015 साली जगतपुरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये नेमबाजी सरावाला सुरुवात केली. 2017 मध्ये तिचा टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीममध्ये समावेश केला गेला.
अवनी म्हणते, आज मै उपर, आसमाँ नीचे…!
‘सुवर्ण जिंकल्यानंतर झालेला आनंद निव्वळ अवर्णनीय आहे. भावना शब्दात मांडणेही कठीण आहे. अगदी थोडक्यात सांगायचे तर जागतिक स्तरावर सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यासारखे मला वाटतेय’, असे अवनी लेखरा याप्रसंगी म्हणाली.
‘एकावेळी केवळ एकाच फटक्यावर लक्ष केंद्रित ठेवायचे, हे मी स्वतःशी निश्चित केले होते’, असे तिने फायनलबद्दल बोलताना सांगितले.









