वाकरे / प्रतिनिधी
आडूर (ता.करवीर ) येथील एका अल्पवयीन मुलीचा मूळचा पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील मात्र सध्या इचलकरंजी येथे राहणाऱ्या तरुणाशी गुरुवारी होणारा विवाह अवनिच्या जागर प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी रोखला.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, आडूर येथील एका गरीब कुटुंबातील १६ वर्षीय मुलीचा पोर्ले तर्फ ठाणे येथील पण सध्या इचलकरंजी येथे राहणाऱ्या तरुणाशी विवाह ठरला होता. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या विवाहाचा साखरपुडा झाला होता. गुरुवारी त्यांचा विवाह होणार होता. याबाबतची माहिती पोलीस पाटील सरिता अभय पोवार यांना कळल्यानंतर त्यांनी संबंधित कुटूंबियांची बुधवारी भेट घेऊन गुरुवारी होणारा हा विवाह थांबवण्यासाठी सांगितले होते. तरीही या कुटुंबाने विवाहाचा बेत आखला होता.
दरम्यान, या विवाहाची माहिती अवनि संचलित जागर प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. या संस्थेच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, शिरोळ, पन्हाळा तालुक्यात पथदर्शी जागर प्रकल्प सुरू करण्यात आला असून या प्रकल्पांतर्गत बालविवाहाच्या निर्मूलनासाठी जनजागरण तसेच शासन यंत्रणांच्या समन्वयाने बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात.
अवनिच्या जागर प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांना हा विवाह आज होणार असल्याची माहिती मिळताच आडूर गावामधील बाल ग्रामसंरक्षण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि अवनि संस्थेच्या जागर प्रकल्पाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. १८ वर्षाखालील मुलीचा विवाह करणे बेकायदेशीर असल्याची समज देऊन नातेवाईकांचे समुपदेशन करण्यात आले. अल्पवयीन मुलीला दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिचा विवाह करण्याची शंका उत्त्पन्न झाल्याने त्या संबधीचा पत्रव्यवहार बाल कल्याण समिती सोबत करण्यात आला आहे. यावेळी ग्राम बाल संरक्षण समिती, ग्रामपंचायत आडूर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सागर दाते आणि अवनिच्या जागर प्रकल्पाचे कार्यकर्ते प्रमोद पाटील, इम्रान शेख, कादंबरी भोसले उपस्थित होते.
Previous Articleऑनलाईन परीक्षेत शिवाजी विद्यापीठाचे एक पाऊल पुढे
Next Article सोलापुरात धाप लागून पती-पत्नीचा मृत्यू









