(अध्याय सहावा)
ज्याने षड्रिपुंवर विजय मिळवलेला असतो त्यांना साधू म्हणतात. असे साधू निरपेक्ष वृत्तीने लोककल्याणकारी कार्य करत असतात. म्हणजे ते एकप्रकारे ईश्वराच्या कार्याला हातभार लावत असतात पण काही समाजकंटकांना लोकांचे कल्याण होत आहे हे सहन होत नसल्याने ते साधू मंडळींना अतिशय त्रास देऊ लागतात. साहजिकच साधूंचे रक्षण करण्यासाठी तसेच दुष्टाना त्यांच्या दुष्कृत्यांची कल्पना देऊन शासन करण्यासाठी ईश्वराचे अवतार होत असतात.
प्रथम ईश्वराने नारायण अवतार घेऊन आत्मशक्तीने पंचमहाभुतांच्या सहाय्याने विश्वाची निर्मिती केली. त्रैलोक्मय हे त्याचे शरीर आहे. त्याच्या शक्तीने सर्व देही आपला व्यवहार करतात. सर्व जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयाला तेच कारणीभूत आहेत. यांचा निवास बद्रिकाश्रमात असतो.
नारायणाचा प्रताप, दृढ तप पाहून इंद्राला कंप सुटला. हा माझे सिंहासन सहज घेऊ शकेल, म्हणून त्याने काम, क्रोध यांना आज्ञा करून नारायणाचा तपोभंग करायला सांगितले. पण नारायणावर त्याचा कसलाही परिणाम झाला नाही. निराश होऊन ते परत फिरले पण नारायणाने सहज लीलेने त्यांची गती कुंठित केली. ते पाहून ते सर्वजण घाबरून गेले पण नारायणाची शांती अपार होती.
कामदेवाची गंमत करायची ठरवून भगवंतानी त्यांच्या योगमायेच्या सामर्थ्याने एक लीला रचली. त्यातून कामदेवाना एक अद्भुत चमत्कार दिसला. रूप, वैभव, अलंकार इत्यादींनी युक्त उत्तमोत्तम स्त्रिया त्यांना दिसू लागल्या. त्या नारायणाच्या सेवेला तत्पर होत्या. त्यांच्या पुढे स्वर्गातून आलेल्या अप्सरा सुर्यापूढे काजव्यासारख्या निस्तेज दिसू लागल्या. नारायणास भुलवण्यास जे आले होते त्यानाच योगमाया दाखवून नारायणाने चकित केले. उघडच आहे कामदेवाच्या मायेच्यापुढे नारायणाला प्राप्त असलेली विद्या योगसामर्थ्यामुळे कितीतरी अद्भुत होती. नारायणाच्या योगसामर्थ्यामुळे चकित झालेल्या कामदेवादी मंडळींची आणखी गंमत करायचे ठरवून, श्रीनारायण त्यांना हसत हसत म्हणाले, ‘तुम्ही अहेर म्हणून यातील एकीचा स्वीकार करा. म्हणजे ती स्वर्गाचे भूषण होईल. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून कामादी गण त्यातील सर्वात सुंदर अशा उर्वशीला घेऊन निघाले. तिला पाहून सर्व देवलोक चकित झाला. इंद्र तर वेडापिसा झाला. धर्मरक्षण आणि सज्जनांना त्रास देणाऱया दुष्टांचे निर्दालन ही दोन प्रमुख कार्ये करण्यासाठी ईश्वरी अवतार होत असतात. ईश्वर जेव्हा अवतार घेतात तेव्हा त्यांचा उल्लेख भगवान किंवा भगवंत असा करतात जसे भगवान राम, भगवान कृष्ण इत्यादि. असे अनेक अवतार घेऊन भगवंतांनी भक्तांचा कैवार कसा घेतला त्याची अति अद्भुत माहिती आपण थोडक्मयात घेऊया. प्रमुख दहा अवतार असून इतर अवतार लक्षात घेता एकूण चोवीस अवतार आहेत प्रमुख दहा असे, मत्स्यः कूर्मो वराहश्च नरसिंहश्च वामनः रामो रामश्च रामश्च कृष्णः कल्किच ते दश। मासा, कासव, वराह, मानवी सिंह, वामन, परशुराम, दशराथी राम, बलराम आणि कल्की. नुसत्या नेत्र कटाक्षाने भगवंत सर्वांचे नियमन करत असतात. हरिनामानेच भक्तांचे संरक्षण होत असते.







