प्रतिनिधी / साटेली भेडशी:
अवघ्या पंधरा दिवसात भेडशी ते शिरंगे करण्यात आलेल्या खडीकरण रस्त्याच्या कामाचा निकृष्टतेचा मुद्दा पुढे आला आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे तर करण्यात आलेली कमकुवत साईडपट्टी या ठेकेदाराच्या निकृष्ट कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी भेडशी ते शिरंगे रस्त्याचे खडीकरण करण्याचे काम पूर्ण झाले. मात्र, पुढील काही दिवसात रस्ता उखडायला सुरुवात झाली आहे. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले तर या मार्गादरम्यान करण्यात आलेल्या साईडपट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ही साईडपट्टी आताच कमकुवत झाली आहे. भेडशी ते शिरंगे रस्त्याच्या खडीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. प्रथमदर्शनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम, कमकुवत साईडपट्टी लक्षात घेता अशा स्थितीत यावर हॉटमिक्सिंग करणे म्हणजे शासनाचा निधी पाण्यात घालण्याचा प्रकार होईल. त्यामुळे पूर्ण रस्त्याची पाहणी करून योग्य दुरुस्ती करावी आणि त्यानंतरच हॉटमिक्सिंगचे काम करावे, अशी मागणी दोडामार्ग तालुका काँग्रेस उपाध्यक्ष शिवदास मणेरीकर यांनी केली आहे.









