डी कॉक-इशानची 116 धावांची अभेद्य सलामी
वृत्तसंस्था/ शारजाह
जलद गोलंदाज ट्रेंट बोल्टचा (4-18) भेदक मारा आणि क्विन्टॉन डी कॉक (नाबाद 46), इशान किशन (नाबाद 68) यांच्या धमाकेदार फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा अक्षरशः धुव्वा उडवला. प्रारंभी, चेन्नईला 20 षटकात 9 बाद 114 धावांवर रोखण्याचा पराक्रम साकारल्यानंतर मुंबईच्या सलामीवीरांनी 12.2 षटकातच बिनबाद 116 धावांसह दणकेबाज विजय संपादन करुन दिला.
विजयासाठी 115 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान समोर असताना क्विन्टॉन डी कॉकने 37 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 46 तर इशान किशनने 37 चेंडूत 6 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 68 धावांचा झंझावात साकारला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत पुन्हा अव्वलस्थानी झेप घेतली आहे.
ट्रेंट बोल्ट (4-18) व त्याच्या सहकाऱयांनी भेदक गोलंदाजी साकारल्यानंतर मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सला निर्धारित 20 षटकात 9 बाद 114 अशा तुलनेने किरकोळ धावसंख्येवर रोखून धरले. या हंगामात प्रचंड खराब फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नईने या लढतीत देखील सपशेल निराशा केली. सॅम करणची (47 चेंडूत 52) अर्धशतकी झुंज चेन्नईच्या डावातील एकमेव वैशिष्टय़ ठरले.
मुंबईने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि नंतर पाहता पाहता चेन्नईचे फलंदाज पत्त्याच्या बंगला कोसळावा, त्याप्रमाणे बाद होत राहिले. पहिल्या तीन षटकात तर चेन्नईचा किमान एक तरी फलंदाज बाद झाला. बोल्टच्या पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर ऋतुराज (0) पायचीत झाला. प्रारंभी, मैदानी पंचांनी त्याला नाबाद दिले. पण, मुंबईने या अपीलविरुद्ध दाद मागितली आणि रिप्लेत तो बाद असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर दुसऱया षटकात बुमराहने अम्बाती रायुडूला यष्टीरक्षक डी कॉककरवी झेलबाद करत चेन्नईला आणखी एक धक्का दिला. उसळत्या चेंडूला पूल करण्याच्या प्रयत्नात रायुडूचा अंदाज सपशेल चुकला. तिसऱया स्थानावरील नारायण जगदीशन तर पहिल्याच चेंडूवर स्लीपमधील यादवकडे झेल देत परतला. डावातील तिसऱया षटकात फॅफ डय़ू प्लेसिस देखील बाद झाला आणि चेन्नईला आणखी एक अनपेक्षित धक्का सोसावा लागला. आऊटसाईड ऑफ स्टम्पवरील चेंडूला कव्हर्सच्या दिशेने फटकावण्याच्या प्रयत्नात प्लेसिसला बाद व्हावे लागले. हा दिग्गज फलंदाज बाद झाला, त्यावेळी चेन्नईची 2.5 षटकात 4 बाद 3 अशी दाणादाण उडाली होती.
अनुभवी रविंद्र जडेजा देखील (7) जम बसण्यापूर्वीच बाद झाला आणि चेन्नईचा पाय जणू आणखी खोलात गेला. जडेजाने बोल्टच्या गोलंदाजीवर मिडविकेटवर तैनात कृणाल पंडय़ाकडे सोपा झेल दिला. डावखुऱया सॅम करणने एक बाजू लावून धरताना फटकेबाजीही केली आणि त्याच्यामुळेच चेन्नई संघाला कसेबसे शतक तरी फलकावर लावता आले.
5 चेंडूत एकही धाव करता न आलेला दीपक चहर हा राहुल चहरचे सावज ठरला. स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न निष्फळ गेल्यानंतर डी कॉकने यष्टी उदध्वस्त केला, त्यावेळी राहुल चहरने क्रीझमध्ये पाय आत घेण्याचा साधा प्रयत्नही केला नव्हता.
सॅमची फटकेबाजी
शार्दुल ठाकुरने (11) कोल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर बॅकवर्ड पॉईंटवरील यादवकडे सोपा झेल दिला. केवळ अंतिम टप्प्यात अर्धशतकवीर सॅम करणच्या फटकेबाजीमुळेच चेन्नईला 114 धावांपर्यंत तरी पोहोचता आले.
धावफलक
चेन्नई सुपरकिंग्स : ऋतुराज गायकवाड पायचीत गो. बोल्ट 0 (5 चेंडू), फॅफ डय़ू प्लेसिस झे. डी कॉक, गो. बोल्ट 1 (7 चेंडू), अम्बाती रायुडू झे. डी कॉक, गो. बुमराह 2 (3 चेंडू), टी. जगदीशन झे. यादव, गो. बुमराह 0 (1 चेंडू), महेंद्रसिंग धोनी झे. डी कॉक, गो. चहर 16 (16 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), रविंद्र जडेजा झे. कृणाल पंडय़ा, गो. बोल्ट 7 (6 चेंडूत 1 चौकार), सॅम करण त्रि. गो. बोल्ट 52 (47 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), दीपक चहर यष्टीचीत डी कॉक, गो. चहर 0 (5 चेंडू), शार्दुल ठाकुर झे. यादव, गो. कोल्टर-नाईल 11 (20 चेंडू), इम्रान ताहीर नाबाद 13 (10 चेंडूत 2 चौकार). अवांतर 12. एकूण 20 षटकात 9 बाद 114.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-0 (ऋतुराज, 0.5), 2-3 (रायुडू, 1.4), 3-3 (जगदीशन, 1.5), 4-3 (प्लेसिस, 2.5), 5-21 (रविंद्र जडेजा, 5.2), 6-30 (धोनी, 6.4), 7-43 (दीपक चहर, 8.5), 8-71 (शार्दुल, 14.5), 9-114 (सॅम करण, 19.6).
गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट 4-1-18-4, जसप्रित बुमराह 4-0-25-2, कृणाल पंडय़ा 3-0-16-0, राहुल चहर 4-0-22-2, नॅथन कोल्टर-नाईल 4-0-25-1, केरॉन पोलार्ड 1-0-4-0
मुंबई इंडियन्स : डी कॉक नाबाद 46 (37 चेंडूत 5 चौकार, 2 षटकार), इशान किशन नाबाद 68 (37 चेंडूत 6 चौकार, 5 षटकार). अवांतर 2. 12.2 षटकात बिनबाद 116.
गोलंदाजी : दीपक चहर 4-0-34-0, हॅझलवूड 2-0-17-0, ताहीर 3-0-22-0, शार्दुल 2.2-0-26-0, जडेजा 1-0-15-0.









