मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून अजिंक्यसेनेची मुक्तकंठाने प्रशंसा
ब्रिस्बेन / वृत्तसंस्था
‘धाडस, उर्जा, स्फूर्ती हे सारे काही तुम्ही दाखवून दिले. अडचणी अनेक होत्या. दुखापतींनी पिच्छा पुरवला होता. पहिल्या कसोटीत 36 धावांमध्येच गारद व्हावे लागल्यानंतर तो आघात वेगळा होता. पण, तुम्ही फिनिक्सि पक्षाप्रमाणे झेप घेतली. या देदीप्यमान कामगिरीबद्दल केवळ भारतीयच नव्हे तर अवघे क्रिकेट विश्व तुम्हाला सलाम करत आहे’, अशा शब्दांत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट संघाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
भारतीय क्रिकेट संघाने गब्बावर यजमान ऑस्ट्रेलियन संघाला ऐतिहासिक धोबीपछाड दिल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनी ड्रेसिंगरुममध्ये सर्व संघसहकाऱयांशी 3 मिनिटे संवाद साधला. कर्णधार अजिंक्य रहाणे, नाबाद अर्धशतकवीर ऋषभ पंत व मैदानावर ठाण मांडून उभे राहिलेल्या चेतेश्वर पुजाराचा त्यांनी येथे विशेष उल्लेख केला. भारताने चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यात 328 धावांच्या कठीण आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत ऑस्ट्रेलियाचा गब्बावरील 32 वर्षांतील पहिला पराभव नोंदवला आणि अर्थातच, संघावर विविध स्तरावरुन स्तुतिसुमनांची अक्षरशः उधळण झाली.
‘हा चमत्कार केवळ एका रात्रीत झालेला नाही. यामागे आपल्या सर्वांची वर्षानुवर्षाची मेहनत आहे. मालिकेत शुभमन सर्वोत्तम खेळला. पुजारा खराखुरा योद्धय़ासारखा लढला आणि ऋषभ तर अव्वल खेळ साकारण्यात यशस्वी ठरला. तो फलंदाजी करत असताना हृदयविकाराचे झटके यावेत, अशी स्थिती होती. पण, त्याने जो पराक्रम गाजवला, तो निव्वळ वाखाणण्याजोगा आहे. संघाचे नेतृत्व साकारताना अजिंक्य रहाणेने दाखवलेला निर्धार, संयम लाजवाब होता. प्रतिकूल स्थितीतून संघाला मुसंडी मारुन देणे अर्थातच आव्हानात्मक होते’, असे शास्त्री पुढे म्हणाले.
नेटबॉलर ते आघाडीचा गोलंदाज या टी. नटराजनच्या प्रवासाचा त्यांनी येथे आवर्जून उल्लेख केला आणि वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर यांच्या योगदानाचीही प्रशंसा केली. यानंतर इंग्लंडचा संघ भारत दौऱयावर येणार असून उभय संघातील पहिली कसोटी दि. 5 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे.
सेहवाग म्हणाला,
ये नया भारत है! घर मे घुसकर मारता है!
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक मालिकाविजय संपादन केल्यानंतर विरेंद्र सेहवागने याची प्राधान्याने दखल घेतली आणि त्याने केलेले दोन ट्वीट वाऱयाच्या वेगाने व्हायरल होत राहिले. यातील पहिल्या ट्वीटमध्ये त्याने एका ट्रकवरील घोषवाक्याचा फोटो पोस्ट करत त्याखाली लिहिले, ये नया भारत है! घर मे घुसकर मारता है!
अन् दुसऱया ट्वीटमध्ये योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र घेत त्यावर तो म्हणाला, आज से ब्रिस्बेन का नाम पंतनगर!









