बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणूक आल्यावर शिवराळ प्रचाराला सुरुवात होते. एकेका पक्षातले विद्वान नेते अकलेचे तारे तोडू लागतात. त्यांची मुक्ताफळे गाजतात तोवर गाजतात. अंगलट येतील ती मुक्ताफळे त्या नेत्यांची वैयक्तिक मते आहेत असे पक्षश्रे÷ाr जाहीर करून अंग झटकून टाकतात. फार वर्षांपूर्वी एका नेत्याने रावणाची जात काढली होती. अलीकडेच एका नेत्याने अमुक एका नेत्याचा चेहरा रावणासारखा असल्याचे सांगितले. यंदाच्या निवडणुकीत जो उठतो तो परस्परांचा धर्म आणि जात काढतो. काही नेते तर एकमेकांच्या आणि स्वतःच्या देखील देवदेवतांच्या जातींचा उद्धार करीत आहेत. असेच पूर्वी काही शहाणे नेते विरोधकांच्या तब्येतीचादेखील उद्धार करायचे, म्हणजे अमुक नेता आजारी आहे म्हणून त्याला मते देऊ नका, आजारी माणसाकडून काय देशसेवा होणार, आम्हालाच मत द्या-असे त्यांचे म्हणणे असे. पहिलवान लोकच देश उत्तम चालवू शकतील असे त्यांना वाटत असावे.
देश चालवण्यासाठी नेमकी काय गुणवत्ता अंगी असावी असे आपल्या जनतेला वाटते? टिनपाट फुडारी एकमेकांचा धर्म आणि जात काढत आहेत. अमुक धर्माचा किंवा जातीचा नेता असेल तरच त्याला खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे. यावर जनरोष प्रकट झाला तर पक्षश्रेठी लगेच ते वैयक्तिक मत ठरवतील.
देश चालवण्यासाठी नेत्याला अमुक शब्दाचा उच्चार नीट करता यावा, त्याला तमुक शब्दाचे स्पेलिंग सांगता यावे असे निकष सोशल मीडियावर हिरिरीने मांडले जातात. एखाद्या नेत्याच्या कित्येक दशकांपूर्वी मरण पावलेल्या आजी-आजोबांवर किंवा पणजोबांवर बिनबुडाचे आरोप करण्याची देखील सध्या फॅशन आहे.
त्यांनी स्वातंत्र्यासाठी काही केले नाही म्हणून आम्हाला स्वातंत्र्यानंतर काय केले हे विचारू नका. त्यांनी सत्तेवर असताना काही केले नाही म्हणून आम्हाला सत्तेवर असताना काय केले हे विचारू नका. आम्ही विकासाऐवजी फक्त एकमेकांच्या जातीवर, धर्मावर, वैगुण्यावर, भूतकाळात ठेवल्या गेलेल्या खऱया-खोटय़ा आरोपांवर बोलत राहू, एकमेकांवर चिखल टाकत राहू.
असा अवघा चिखल एक झाला आहे. सगळे नखशिखांत माखलेला चिखल अभिमानाने मिरवत आहेत आणि उडदामाजी काळेगोरे काय निवडावे असा आपल्याला प्रश्न पडला आहे.








