टीव्ही-डी1’ची आज पहिली उड्डाण चाचणी : इस्रोच्या मोहिमेची तयारी पूर्ण
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
गगनयान मोहिमेच्या पहिल्या उड्डाण चाचणीची उलटी गिनती सुरू झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आपल्या गगनयान मोहिमेची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. गगनयान मिशन अंतर्गत, ‘टीव्ही-डी1’ आपल्या पहिल्या चाचणीसाठी आज म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी उड्डाण करेल. ‘टीव्ही-डी1’ सकाळी आठ वाजता श्रीहरिकोटा येथून रवाना होणार आहे. या चाचणीमुळे मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम ‘गगनयान’ला नवे बळ प्राप्त होणार आहे.
गगनयान 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पहिले उड्डाण करेल. गगनयान मोहिमेच्या ‘टीव्ही-डी1’ या पहिल्या चाचणी उड्डाणानंतर नजिकच्या काळातच आणखी तीन चाचणी उड्डाणे टीव्ही-डी2, टीव्ही-डी3 आणि टीव्ही-डी4 पाठवली जातील. या चाचण्यांच्या यशावरच पुढील संपूर्ण योजना अवलंबून असल्यामुळे ह्या सर्व चाचण्या इस्रोसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. भारताची गगनयान मोहीम यशस्वी झाल्यास भारतीय अंतराळवीरांना अवकाशात अभ्यास करण्याची आणि अवकाशातील वातावरण समजून घेण्याची संधी मिळेल. हे मिशन देशाला अंतराळ संशोधन क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासात चांगली दिशा देऊ शकते. याशिवाय मिशनच्या यशानंतर भारत अमेरिका, चीन आणि रशियानंतर असे करणारा चौथा देश ठरणार आहे.
गगनयान मिशनचे बजेट 90.23 अब्ज रुपये
गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असून ती तीन दिवस चालणार आहे. यामध्ये 3 सदस्यांची टीम पृथ्वीच्या 400 किमी वरच्या कक्षेत पाठवली जाईल. यानंतर क्रू मॉड्यूल समुद्रात सुरक्षितपणे उतरवले जाईल. मोहिमेतील ‘टीव्ही-डी1’ वाहनाची लांबी 34.9 मीटर आहे, तर त्याचे वजन 44 टन आहे. गगनयान मोहिमेसाठी अंदाजे 90.23 अब्ज रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मोहिमेच्या पहिल्या चाचणी उड्डाणात इस्रो क्रू मॉड्यूल बाह्य अवकाशात पाठवेल, त्यानंतर ते जमिनीवर परत येईल. उड्डाणादरम्यान नेव्हिगेशन, सिक्वेन्सिंग, टेलीमेट्री, ऊर्जा इत्यादींचे कार्य तपासले जाईल. तसेच मोहिमेवेळी रॉकेटमध्ये काही बिघाड झाल्यास अंतराळवीराला सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणाऱ्या यंत्रणेची चाचणी घेतली जाईल.
फ्लाईटचे तीन भागात विभाजन
इस्रोच्या या मिशनला गगनयान टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेसाठी बनवण्यात आलेल्या साधनाची सिंगल स्टेज लिक्विड रॉकेट, क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम अशा तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. क्रू मॉड्यूलमधून अंतराळवीर पृथ्वीभोवती 400 किलोमीटर उंचीवर कमी कक्षेत फिरतील. यामध्ये अंतराळवीरांसाठी अनेक सुविधांचा समावेश आहे. क्रू मॉड्यूलमध्ये नेव्हिगेशन सिस्टीम, फूड हिटर, फूड स्टोरेज, हेल्थ सिस्टीम आणि टॉयलेट इत्यादी सर्व गोष्टी असतील. त्याचा आतील भाग उच्च आणि कमी तापमान सहन करेल. हे अंतराळवीरांचे अंतराळातील किरणोत्सर्गापासून संरक्षण देखील करेल. या मोहिमेत काही समस्या निर्माण झाल्यास अंतराळवीरासह हे मॉड्यूल त्यांना सुरक्षितपणे खाली आणू शकते. क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम वेगळे झाल्यानंतर ते समुद्रात उतरवले जाईल. अंतराळवीरांच्या सुरक्षित लँडिंगसाठी पॅराशूट मदत करेल.
पुढील वषी मानवरहित उड्डाण
गगनयान मिशनच्या पहिल्या मानवरहित मोहिमेचे नियोजन पुढील वषीच्या सुऊवातीला केले जाऊ शकते. मानवरहित मिशनमध्ये ह्युमनॉइड रोबोट म्हणजेच पूर्णपणे मानवी स्वरूपाचा रोबोट ‘व्योमित्र’ पाठवण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यावर मानवाला अवकाशात पाठवले जाईल. भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण 2025 मध्ये होण्याची शक्मयता आहे.
गगनयान मोहिमेची घोषणा पंतप्रधान मोदींनी 2018 मध्ये आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती. 2022 पर्यंत हे मिशन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, परंतु कोविड महामारीमुळे त्यास विलंब झाला. आता हे मिशन 2024 च्या अखेरीस किंवा 2025 च्या सुऊवातीला पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गगनयान मोहिमेच्या पहिल्या चाचणी उड्डाणापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी इस्रोसोबत बैठक घेत आढावा घेतला. या बैठकीमध्ये त्यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना व्हीनस ऑर्बिटर मिशन आणि मार्स लँडरवर काम करण्यास सांगितले. तसेच 2035 पर्यंत भारतीय अंतराळ केंद्र स्थापन करण्याचे आणि 2040 पर्यंत पहिल्या भारतीयाला चंद्रावर पाठवण्याचे उद्दिष्ट इस्रोच्या शास्त्रज्ञांना देण्यात आले आहे.









