प्रतिनिधी / बांदा:
शुक्रवारी दुपारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसात नगदी पिकाचे उत्पन्न घेणाऱया शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीची बसलेली झळ अजूनही कायम असताना अवकाळी पावसाचे दुसरे संकट ओढावल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
बांदा परिसरात शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपले. अचानकपणे झालेल्या या पावसामुळे शेतकऱयांची धांदल उडाली. अवकाळी पावसाने आंबा, काजूचे उत्पन्न घटणार असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर मिरची, चवळी ही नगदी पिकेही धोक्यात आली आहेत. ऐन काजू हंगामातच गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱयांची चिंता वाढली आहे.
या भागात मोठय़ा प्रमाणावर चवळी, नाचणी, भुईमूग, मिरची, मका, कुळीथ आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. शुक्रवारी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. अतिवृष्टीत शेतकऱयांना नुकसानीची बसलेली झळ भरून काढण्यासाठी पुन्हा नव्या दमाने शेतकरी उभा झाला होता. काढणीयोग्य आलेल्या आंबा व काजू पिकांवर काळे डाग पडल्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेत दर विक्रीवर होणार आहे. कमी दरात काजू, आंबा विकला गेल्यास केलेला खर्चही हाती मिळणार नसल्याची चिंता बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.
आंबा व काजू बागायतदारांनी मोठय़ा प्रमाणात सहकाराच्या माध्यमातून कर्जाची उचल केलेली आहे. परंतु पडलेल्या अवकाळी पावसामुळे उत्पन्नात घट होणार असल्यामुळे कर्ज कसे फेडणार असा मोठा प्रश्न शेतकऱयांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे कर्जमाफी जरी देता आली नसली तरी सरकारने निदान व्याजमाफी तरी करावी, अशी मागणी आंबा, काजू बागायतदारांमधून होत आहे. stamp









