खेड कासईत अंगावर वीज कोसळून विवाहितेचा जागीच मृत्यू
प्रतिनिधी/ रत्नागिरी
ऐन दिवाळी सणात अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्हय़ाला तडाखा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱया पावसाने अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, लांजा आदी भागात दिवाळी सणामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला होता. त्यानंतर गेले दोन दिवस सायंकाळच्या वेळेत पावसाचा शिडकाव होत आहे. शनिवारी सायंकाळी गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. भाऊबीजेच्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने सर्वांच्या उत्साहावर विरजण पडले. खेड तालुक्यात कोसळलेल्या पावसाने वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसापासून वीजांच्या चमचमाट व मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टी सुरूच आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सतत कोसळणाऱया पावसामुळे कापून ठेवलेले भात भिजल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
अंगावर वीज कोसळून विवाहितेचा जागीच मृत्यू
खेड तालुक्यातील कासई-धनगरवाडी येथे अंगावर वीज कोसळून सुरेखा सुरेश खरात या 38 वर्षीय विवाहितेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पर्जन्यवृष्टीने साऱयांचीच तारांबळ उडाली. मुसळधार पाऊस पडून भाताची उडवी भिजण्याच्या शक्यतेने सुरेखा खरात ही विवाहिता उडवीवर ताडपत्री टाकण्यासाठी घराबाहेर पडली. ताडपत्री टाकत असतानाच अचानक वीजेचा लोळ तिच्या अंगावर कोसळला. या दुर्घटनेत विवाहिता जागीच गतप्राण झाली.
याबाबतची खबर पती सुरेश बाळकृष्ण खरात यांनी येथील पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या पश्चात पती, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकासमोरचा वृक्ष कोसळून वाहतूक ठप्प
चिपळूण शहर परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह तासभर पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोरचा वृक्ष कोसळून रस्त्यावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली होती. गुरूवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी 4 वाजता वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर शनिवारी भाऊबिजेच्या दिवशीही सायंकाळी 4.30 वाजता अचानक अंधार करत विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्यांची तसेच रस्त्यावर व्यवसाय उभारलेल्या व्यापाऱयांचीही तारांबळ उडाली. यातच 5 वाजण्याच्या सुमारास सोसाटय़ाच्या वाऱयामुळे बसस्थानक आवारात असलेला जुनाट वृक्ष भोगाळेकडे जाणाऱया रस्त्यावर कोसळला. पाऊस सुरू असल्याने सुदैवाने यावेळी रस्त्यावर वर्दळ नव्हती. यातच वृक्ष कोसळत असतानाच तेथून जाणारी एक रिक्षा मात्र त्यातून बचावली. हा वृक्ष थेट रस्त्यावर कोसळल्याने भोगाळेकडे जाणारी व बसस्थानकाकडे येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. या घटनेची माहिती नगरपरिषदेच्या कर्मचाऱयांना समजल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी वृक्ष रस्त्यावरुन बाजूला करून ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत सुरु केली.
वीजवाहिनी पडून राजापुरात 4 म्हशीचा मृत्यू
राजापूर तालुक्यात शनिवारी सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता सौदळ पाजवेवडी येथे वीजवाहीनी पडून चिखलगाव येथील सहदेव धोंडू नकाशे यांच्या 3 म्हशी व अनिल बुधाजी कोरगावकर यांची 1 म्हैस मयत झाली आहे.









