पालकमंत्री ऍड. अनिल परब यांची पत्रकार परिषदेत माहिती : ‘अवकाळी’मुळे 11 हजार हेक्टर शेतीचे नुकसान
प्रतिनिधी / रत्नागिरी
अवकाळी पावसामुळे जिह्यातील 11 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले. नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून 8 कोटी 50 लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. पंचनामे करताना शेतकऱयांचा बँक खाते क्रमांक घेण्यात आला आहे. त्यामुळे भरपाई तत्काळ त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिले.
जिह्यात अवकाळी पावसामुळे सुमारे 11 हजार हेक्टरचे नुकसान झाले. त्यासाठी 9 कोटी 58 लाखाचा नुकसान भरपाईचा निधीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यापैकी 8 कोटी 50 लाखाचा निधी थेट खात्यात जमा होणार आहे. मात्र निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसान भरपाईतील 30 कोटी जादा निधी आला आहे. शासनाकडे तो परत जाणार आहे. मात्र ज्यांचे संसार उघडय़ावर पडले, त्यांना भांडी-कुंडी आदींसाठी 10 कोटींची गरज आहे. या जादा निधीतील 10 कोटी कोणत्या हेडखाली खर्च करावे, यासाठी शासनाच्या वित्त विभागाची परवानगी घेऊन खर्च करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालकमंत्री ऍड. परब यांनी दिली.
जिह्याची आढावा बैठक बुधवारी पालकमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड उपस्थित होत्या.
यावेळी ऍड. परब यांनी निसर्ग चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषयांचा आढावा घेतला. यामध्ये निसर्ग चक्रीवादळात मंडणगड, दापोली तालुक्याचे मोठे नुकसान झाले. भरपाई म्हणून शासनाकडून 30 कोटीचा जादा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी शासनाला परत जाणार आहे. दरम्यान या दोन्ही तालुक्यात झालेल्या पंचनाम्यात अनेकांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. त्यांना सावरण्यासाठी भांडी-कुंडी आदी देण्याची गरज असून 10 कोटी रुपये अपेक्षित आहेत, परत जाणाऱया जादा निधीपैकी 10 कोटी रुपये खर्च करण्याचा हेड नसल्याने हा विषय दीड महिना झाले रखडला आहे. त्यामुळे शासनाच्या वित्त विभागाशी चर्चा करून तो कोणत्या हेडखाली खर्च करता येईल, याचे मार्गदर्शन घेऊन तो खर्च केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
काम करताना आम्ही कोणतेही राजकारण करत नाही
ज्यांना शेतीबद्दल काही माहिती नाही. अशी लोक काहीही सांगतील. आम्ही काम करताना कोणतेही राजकारण करत नाही. त्यामुळे टीकाकारांनी शेती, गटशेतीबाबत काही माहिती नसताना टीका करू नये, अशी प्रतिक्रियाही यावेळी पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी दिली.









