अनेक ठिकाणी झाडे पडली; विधुत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न; पावसाची नोंदच नाही
सातारा/प्रतिनिधी
गुरुवारी सायंकाळी उशिरा सातारा शहराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. अगोदरच सातारकर कोरोनाच्या दहशतीच्या वातावरणात आहे. त्यातच कमालीचा उष्मा जाणवत होता. अचानक झालेल्या पावसाने शहरात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. कूपर कॉलनी येथे विधुत तारेवर झाडाची फांदी पडल्याने विधुत पुरवठा खंडित झाला आहे. समर्थ मंदिर येथे पोल खचला असल्याने त्या ही भागातली विधुत पुरवठा खंडित झाला असून महावितरण कंपनीचे पथक दुरुस्तीमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, या पावसाची सातारा पालिका, तहसील कार्यलयात ही पर्जन्यमापक यंत्रावर नोंद घेण्यात आली नसल्याचे समजते.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार अचानक वातावरणात बदल होऊन गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह सातारा शहराला चांगलेच झोडपून काढले. रात्री उशिरा अकरा पर्यंत हा पाऊस सुरू होता.या पावसाने व्यंकटपुरा पेठेत गोखले हौदानजीक नारळाचे झाड पडले.थोरात यांनी लगेच रात्री ते बाजूला काढले.शाहू मंडळाच्या नजीक एक झाड पडले आहे.सातारा नगरपालिकेच्या समोरच्या छत्रपती शाहू महाराज उद्यानात झाडांच्या फांद्या पडल्या आहेत.कूपर कॉलनीत झाडाच्या फांद्या विधुत वाहक तारेवर पडल्या आहेत.तर समर्थ मंदिर येथे एक पोल खचला असल्याने तो बदलण्याचे काम सुरू आहे.महावितरण कंपनीचे अधिकारी जितेंद्र माने हे पन्नास जणांची टीम घेऊन शहरात दुरुस्तीचे काम करत आहेत. इतर ठिकाणी पावसाने नुकसान झाल्याची आपत्ती व्यवस्थापनकडे नोंद झाली नाही.पावसाची नोंद घेण्यासाठी सातारा पालिका आणि सातारा तहसील कार्यलयामध्ये पर्जन्य मापक यंत्र आहे ते काल ठेवले गेले नसल्याने पावसाची नोंद निश्चित समजू शकली नाही.
पालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क
शहरात अवकाळी पावसाने कोठे काही झाले याच्या नोंद घेऊन लगेच तेथे पोहचून मदत देण्यासाठी सातारा नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यन्वित आहे.मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या सुचनेनुसार हा विभाग काम करत आहे.
Previous Articleहातकणंगले बस स्थानकात परप्रांतीय कामगारांनी मांडला ठिय्या
Next Article अंडरवर्ल्ड डॉन मुथप्पा रायचे निधन








