रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेच्या अळणावर ते लोंढा या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे सुरक्षा विभागाचे आयुक्त ए. के. राय यांनी रविवारी या कामाची पाहणी केली. एकूण 33.16 किलो मीटरच्या या मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले असून यामुळे रेल्वेची गती अधिक वेगाने वाढणार आहे.
पुणे-बेंगळूर रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासोबतच विद्युतीकरण केले जात आहे. हॉस्पेट-हुबळी-लोंढा-वास्को या मार्गावरील लोंढा ते अळणावर मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. रेल विकास निगमच्या माध्यमातून रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण केले जात आहे. विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची पाहणी आयुक्तांच्या उपस्थितीत करण्यात आली. याचसोबत त्यांनी तावरकट्टी, देवराई या परिसरात फुट ओव्हरब्रिज क्रॉसिंग गेट यासह इतर भागाची पाहणी केली. यावेळी हुबळी विभागीय व्यवस्थापक अरविंद मालखेडे, मनोज महाजन, एम. रामकृष्ण, दिनेश जैन यांच्यासह इतर रेल्वे अधिकारी उपस्थित होते.









