उत्तर प्रदेशातील संतापजनक घटना, तीन व्यक्तींना अटक
लखनौ / वृत्तसंस्था
15 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून तिचे सक्तीने धर्मांतर केल्याची घटना उत्तर प्रदेशातील बाघपत येथे घडली आहे. ही युवती दलित समाजातील आहे. तिने व तिच्या मातापित्यांनी या संबंधात तक्रार सादर केल्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी शहझाद (26) याने या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे तक्रारीत सांगण्यात आले. शहझाद याचे यापूर्वीच लग्न झालेले आहे. मात्र, त्याने ही बाब लपवून ठेवून या युवतीला आपल्या वासनेची शिकार बनविल्याची माहिती पोलीसांनी दिली. शहझाद याचे दोन भाऊ बिलाल आणि फर्मान यांनीही या युवतीवर बलात्कार केला. नंतर शहझादचे आईवडील अनुक्रमे गुल्फशान आणि हरुन यांनी अन्य 3 लोकांच्या मदतीने तिचे सक्तीने धर्मांतर केले. अखेर अत्याचार असहय़ झाल्याने तिने पोलिसांमध्ये तक्रार सादर केली. त्यानंतर शहझाद आणि त्याच्या आईवडिलांना अटक करण्यात आली. अन्य चार आरोपींचा शोध घेतला जात आहे. लैंगिक अत्याचारानंतर ही युवती गर्भवती झाली. तथापि तिचा गर्भ आरोपींकडून सक्तीने पाडण्यात आला, असे तक्रारीत सांगण्यात आले आहे. सध्या या युवतीची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले.
संतापाची लाट
या प्रकारामुळे बाघपत भागात संतापाची लाट उसळली असून तणाव निर्माण झाला आहे. स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याचा दावा पोलिसांनी केला. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन दोषींना कठोर शिक्षा देण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. पोलिस वेगाने तपास करीत आहेत.









