वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी / वडूज
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बाळू भिमराव मदने (रा. वावरहिरे ता. माण) यास वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सन 2014 ते 2015 दरम्यान आरोपी बाळू भिमराव मदने याने अल्पवयीन पिडितेच्या राहत्या घरात तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला होता. पिडीत अल्पवयीन मुलगी चार महिन्याची गरोदर राहिली होती. पिडीतीने दिलेल्या तक्रारीवरून बाळू मदने यावर दहिवडी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता.
या गुह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कवडे यांनी केला तर पोलीस हवालदार वाय. एम. जामदार यांनी मदत केली. आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र स.पो.नि. समाधान चवरे यानी जिल्हा न्यायालय वडूज येथे दाखल केले. याकामी सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक जिल्हा सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम पाहिले. या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाबजबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी बाळू मदने यास दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पिडित मुलीस नुकसान भरपाई स्वरूपात देण्यात येत आहे. याकामी सरकारी वकील यांना प्रॉसिक्युशन स्क्वॉड दहिवडीचे पोलीस हवालदार दीपक शेडगे, दत्तात्रय जाधव, पो. कॉ. जयवंत शिंदे, अक्षय शिंदे यांनी सहकार्य केले.









