क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी चषक 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अलोन्स स्पोर्टसने साईराज हुबळी टायगरचा केवळ तीन धावांनी तर सहारा स्पोर्टसने एमसीसी नुली संघाचा 36 धावांनी पराभव केला. अष्टपैलू सिद्धार्थ हुलोळी, रोशन तालबेलकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर शनिवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात अलोन्स स्पोर्टसने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात सर्व गडी बाद 131 धावा केल्या. त्यात कामिल बाँबेवालेने 4 चौकारासह 25, यश हावाळाण्णाचेने 23, मयुर शिरोडकरने 15, तर आदित्य हिरेमठने 12 धावा केल्या. साईराजतर्फे गोलंदाजी करताना समर्थ पावलेने 32 धावात 3, दर्शन मयेकरने 19 धावात 2, तर रोहन यारीसिमी व सुजल पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल साईराज हुबळी संघाने 25 षटकात 9 गडी बाद 128 धावाच केल्या. त्यात केदार उसुलकरने 5 चौकारासह 30, नवनीत मराठेने 2 षटकार, 3 चौकारासह 28, आकाश कुलकर्णीने 23, रोहन यारीसिमीने 12 धावा केल्या. अलोनतर्फे सिद्धार्थ हुलोळीने 14 धावात 2, ओमकार देशपांडेने 26 धावात 2, ऋषीकेश पाटीलने 29 धावात 2 तर यश हावाळाण्णाचे 1 गडी बाद केला.

दुसऱया सामन्यात सहारा स्पोर्टसने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात सर्वबाद 180 धावा केल्या. त्यात रोहन तालबेलकरने 10 चौकारासह 66, जुबेर सावनूरने 33, मनोज सुतारने 4 चौकारासह नाबाद 36 तर रियानने 14 धावा केल्या. एमसीसीतर्फे अजुम मुल्लाने 16 धावात 2, रेहान संदीने 21 धावात 2 तर भुवन आणि महेश यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एमसीसी संघाने 25 षटकात 7 गडी बाद 144 धावाच केल्या. त्यात सॅमसंग धवळेने 4 चौकारासह 30, अंजुम मुल्लाने 20, तर आदित्य कांटेने नाबाद 44 धावा केल्या. सहारातर्फे आकाश मोरोबादने 22 धावात 3, मनोज सुतारने 23 धावात 2 तर रोशन तालबेलकरने 15 धावात 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे उद्योगपती सुनील सौदी, नलीनी पाटील, विक्रम देसाई, सलीम फणीबंद यांच्या हस्ते सिद्धार्थ हुल्लोळीला तर महेश कुलकर्णी, सुभाष सनदी, मोहन परब, प्रमोद जपे यांच्या हस्ते रोशन तालबेलकरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
रविवारचे सामने
1) एक्सेस इलाईट विरुद्ध साईराज हुबळी टायगर यांच्यात सकाळी 9 वा. 20 मिनिटानी
2) सुपर एक्सप्रेस अर्जुन स्पोर्टस विरुद्ध एमसीसी यांच्यात 1.30 वाजता









